Pune News : लस घेऊनही पुण्यात 12 हजार जणांना कोरोनाची लागण, तर 59 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे शहरात लसीकरणानंतरही नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. पुण्यात आता पर्यंत पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही 12 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाला असून, आतापर्यंत 59 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यात आतापर्यंत 5 लाख 5 हजार 705 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, 9 हजार 90 जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. यावर्षी 16 जानेवारीपासून पुण्यासह संपूर्ण देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची आणि मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत 51 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी 31 लाख 98 हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला असून 19 लाख नागरिकांनी दोन्हीही डोस घेतले आहेत.

मात्र, लस घेतल्यानंतर करोना होणार नाही, असा दावा कोणत्याही कंपन्यांनी किंवा सरकारने कधीच केलेला नाही. केवळ या रोगाची तीव्रता कमी होईल, असे स्पष्ट केलेले आहे. परंतु, लस घेतलेल्या नागरिकांकडून सुरक्षेचे कुठलेही नियम पाळले जात नाहीत, यातूनच लस घेऊनही बाधिताच्या संपकांत आल्यानंतर लागण होत आहे.

लसीकरण झाल्यानंतर कोरोना होणारच नाही असा दावा करण्यात आलेला नाही. मात्र, कोरोना झाल्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असे लसीकरणाच्या सुरूवातीलाच स्पष्ट करण्यात आले आहे. मागील दहा महिन्यात प्रामुख्याने लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर तसे परिणाम दिसूनही येत आहेत. पुण्यातही पहिला डोस घेतलेल्या 5 हजार 621 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 33 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच दोन्ही डोस घेतलेले 6 हजार 681 जणांनाही कोरोना झाला असून, यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 1 हजार बाधित क्रिटिकल असल्याचे समोर आले आहे.

लसीकरणानंतरही कोनाची लागण होत असताना कोमॉर्बिडीटी असलेल्यांचा मृत्यूही होत आहे. हे यातून स्पष्ट होत आहे. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असून, अन्य आजारांची तीव्रता असलेल्यांचा प्रसंगी मृत्यूदेखील होत आहे. हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत होत असताना नागरिकांनी कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, गर्दीपासून दूर राहाणे, सर्दी व खोकल्यासारखी लक्षणे दिसू लागल्यास त्वरीत तपासणी करून घ्यावी, तसेच आरोग्याशी संबधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.