Pimpri News: राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या संकल्प व ध्येयनिश्चितीच्या महामेरू- शिवश्री प्रकाश जाधव

एमपीसी न्यूज: स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिशादर्शक बनलेल्या राजमाता या लौकिकार्थाने संकल्प व ध्येयनिश्चितीच्या महामेरू होत्या , असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री प्रकाश जाधव यांनी आज येथे केले.

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या तीन संघटनांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संत तुकाराम नगर येथील सांस्कृतिक भवनात या दोन्ही युगमाता व युगपुरुषास अभिवादन करण्यात आले. व जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड सुनिता रानवडे होत्या.

शिवश्री जाधव पुढे म्हणाले,शहाजी राजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. तो संकल्प जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून पूर्ण केला.जिजाऊ स्वत: च युद्ध कलेत व राजनीतीत निपुण होत्या. जिजाऊ याच ख-या शिवरायांच्या मार्गदर्शक व गुरू होत्या ,असे त्यांनी स्पष्ट केले.

तर आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड सुनिता रानवडे यांनी, ‘शिवनेरी जवळच आपले गाव असल्याने लहानपणापासूनच जिजाऊंच्या तेजस्वी विचारांचा पगडा आपल्यावर रूजला होता व त्यामुळेच मी यशस्वी वाटचाल करू शकले अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार ,मराठा सेवा संघ वधू वर कक्षाचे शहर अध्यक्ष शिवश्री मोहन जगताप, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा सुनिता शिंदे ,शहर अध्यक्ष स्मिता म्हसकर, रत्नप्रभा सातपुते ,संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष प्रविण कदम ,प्रकाश बाबर ,सुभाष देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अभिमन्यू पवार, सुनिताताई शिंदे, अॅड सुनिल कदम ,आदींनीही आपल्या भाषणातून जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे आयोजन मोहन जगताप, प्रकाश बाबर, सुभाष देसाई, सुरेश इंगळे,अशोक सातपुते यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.