Pimpri News : साहित्यिक चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याचा निर्धार

एमपीसी न्यूज – पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच भोसरी  येथे घेण्यात आली.  

पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम सदाफुले, उपाध्यक्ष कवयित्री संगीता झिंजूरके, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख सुरेश कंक, पुणे विभाग प्रमुख कवी राजेंद्र वाघ, सदस्य जयवंत भोसले, अरुण गराडे यावेळी उपस्थित होते.

वर्षभर घेण्यात येणाऱ्या साहित्यिक उपक्रमाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यशवंतराव चव्हाण आणि पद्यश्री नारायण सुर्वे यांचे विचार ही  एक प्रचंड मोठी उर्जा आहे. नारायण सुर्वे यांच्या नेरळ निवासस्थानी कृष्णामाई सुर्वे यांच्या उपस्थितीत  प्रतिवर्षी घेतले जाणारे काव्यजागर कविसंमेलन, यशवंत वेणू पुरस्कार, गदिमा कविता महोत्सव, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला होणारी श्रमउद्योग परिषद, जे.आर.डी टाटा उद्योग पुरस्कार, ग्रामजागर साहित्य संमेलन, शिवार साहित्य संमेलन, श्यामची आई पुरस्कार सोहळा, शिक्षक प्रतिभा संमेलन या विविध साहित्यिक उपक्रमातून हे विचारधन साहित्य रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी या संस्था कार्यरत आहेत.

सर्वांनी एकत्र मिळून काम करूया व साहित्यिक चळवळ आधिक लोकाभिमुख करूया असा निर्धार या सभेत करण्यात आला. सुदाम भोरे यांच्या हस्ते कवी राजेंद्र वाघ यांचा सन्मान यावेळी करण्यात आला, कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र त्यांना यावेळी देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.