Devak Kalji Re: ‘देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे’…

एमपीसी न्यूज – गणपतींचे गाव अशी ज्याची सातासमुद्रापार ख्याती आहे अशा पेणमधील एका गणेशमूर्तीकारांच्या कारखान्यात एका आजींचा फोन येतो. त्या वर्षानुवर्षे त्या कारखान्यात तयार झालेली गणपतीची मूर्ती गणेश चतुर्थीच्या आधी नेत असत. यंदा मात्र करोनाचे महाभयानक संकट असल्याने मूर्ती कशी काय मिळणार हा त्यांना प्रश्न पडलेला असतो. बरं गंमत अशी असते की त्या आजी राहायला वाशी येथे, त्या मूर्ती घेत असत पुण्यातील त्यांच्या एका ठराविक दुकानदाराकडून. मात्र ती मूर्ती येत असे पेणमधून. आणि एवढंच नाही तर त्या आजी ती मूर्ती त्यांच्या गावी पूजेसाठी घेऊन जात असत. अगदी खरोखरची त्रिस्थळी यात्रा…

यंदा पूजेसाठी मूर्ती कशी काय मिळणार हा त्यांच्या पुढचा यक्षप्रश्न. म्हणून त्या डायरेक्ट पेणलाच फोन करतात. खरंतर त्या कारखान्यातून पुण्याला जाणा-या मूर्ती याआधीच पाठवलेल्या असतात. पण त्यात आजींची मूर्ती असेल किंवा नाही याची त्या कारखानदाराला माहिती नसते. म्हणून तो आजींना माहिती घेऊन सांगतो असे उत्तर देतो. योगायोगाने त्या मूर्तीकाराकडे सासवडला जाणारे एक गृहस्थ गणेशमूर्ती नेण्यासाठी खास येतात. त्यांना सहजच विचारावे म्हणून मूर्तीकार त्यांच्या गाडीत आजींच्या गणेशाची सोय होऊ शकेल का म्हणून विचारतो. ते गृहस्थ तोंड भरुन होकार देतात. पुण्यात ती मूर्ती कोठे पोचवायची याची माहिती तो मूर्तीकार त्यांना देतो. आणि ‘गणपतीबाप्पा मोरया’च्या गजरात ती मूर्ती पुण्यासाठी रवाना होते.

सासवडला जायच्या आधीच ते गणपती बाप्पा पुण्यातील दुकानात पोचतात. दोन दिवसांनी पेणमधील त्या मूर्तीकाराला फोन येतो. तो फोन त्या वाशीमधील आजींचाच असतो. त्या भरल्या कंठाने सांगत असतात. माझे बाप्पा माझ्या वाशीत आले. आता त्यांना घेऊन मी गावी निघाले आहे. इतक्या वर्षांची बाप्पांची पूजा यंदा या करोनाच्या महामारीत देखील चुकणार नाही याचे समाधान आहे. शेवटी काय ‘देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे’…

_MPC_DIR_MPU_II

थोड्याफार फरकाने असाच किस्सा एका गृहस्थांच्या बाबतीत घडला. पिढ्यानपिढ्या पेणचे रहिवासी असलेले ते गृहस्थ मागील वीस वर्षांपासून नोकरीनिमित्त दुस-या गावी राहात आहेत. पण अस्सल पेणकर असल्याचा अभिमान असल्याने दरवर्षी गणेशचतुर्थीची पूजेची गणेशमूर्ती पेणहूनच आणत असत. यंदा करोनाच्या संकटाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले असल्याने गणेशमूर्ती कशी काय आणायची हा प्रश्नच होता. मातीची मूर्ती आणावी की घरातल्या पूजेत असलेल्या गणेशाची पूजा करावी किंवा दुसरा कोणता मार्ग अनुसरावा हे समजतच नव्हते.

मुळात गणेश पूजन म्हणजे काय तर गणेशचतुर्थीला पार्थिव गणेशाचे पूजन करायचे असते. प्राणप्रतिष्ठापना करुन त्यात प्राणतत्व आणायचे असते. दोन दिवसांसाठी पाहुण्या आलेल्या त्या गणरायाची षोडशोपचारे, नैवेद्यासहीत पूजा करायची असते. त्याची मनोभावे प्रार्थना करायची असते. सगळ्या घरादाराला सुखी ठेव असा आशीर्वाद मागायचा असतो आणि दुस-या दिवशी भरल्या कंठाने, साश्रुनयनाने पुनरागमनायचं असं म्हणून त्याला त्याच्या घरी परत पाठवायचे असते.

पण यंदा ही परंपरा खंडीत होणार की काय असा त्या गृहस्थांना प्रश्न पडतो. सहजच ते पेणमधील त्यांच्या ठराविक मूर्तीकारांना फोन करतात. ते मूर्तीकार त्यांना आश्चर्याचे एकामागून एक सुखद धक्केच देतात. त्यांची नेहमीची गणेश मूर्ती तयार आहे. तसेच ते ज्या गावी राहतात तेथील एकजण स्वतसाठी मूर्ती नेण्यासाठी येथे आलेले होते. त्यांच्या गाडीत जागा होती. त्यांच्याबरोबर तुझ्या मूर्तीची पाठवणी केली आहे. अगदी होम डिलिव्हरीने मूर्ती तुला मिळेल. तसेच त्या गृहस्थांचा फोन नंबर देखील मूर्तीकारांनी दिला. त्या गृहस्थांनी त्या नंबरवर संपर्क साधला. तेव्हा त्यांना कळले की ते आत्ताच पेणहून गावी पोचले आहेत. लगेच आलात तर मूर्ती लगेच घेऊन जाऊ शकता. आणि गंमत म्हणजे एरवी ती व्यक्ती कोण हे एका गावात राहून देखील माहित नसलेले ते दोघे एकमेकांना गणपतीच्या निमित्ताने प्रथमच भेटतात.

गणेशपूजेची परंपरा खंडीत न झाल्याचे त्या गृहस्थांना मनोमन समाधान वाटतेच. पण त्याचबरोबर मनापासून श्रद्धा असेल, भक्ती असेल तर तो विघ्नहर्ता सर्व विघ्ने दूर करतो याचा प्रत्यय देखील येतो. म्हणूनच परत एकदा म्हणावेसे वाटते, ‘देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे’…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.