Shirur News : विकासाला विरोध नाही मात्र प्रकल्पबाधितांचा विचार व्हावा

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची रिंग रोड बैठकीत मागणी

एमपीसी न्यूज –  विकासाला विरोध नाही, परंतु रिंग रोड आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे 7 गावातून एकाच गटातून जाते आहे. अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबाबत सकारात्मक विचार व्हावा. तसेच मेट्रो, रेल्वे, ग्रीनफिल्ड हायवेसह इंटिग्रेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्रकल्प राबवावा अशा मागण्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रिंग रोड सादरीकरण बैठकीत केल्या.

खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे रिंग रोडबाबत सादरीकरण व बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत खासदार डॉ. कोल्हे यांनी एकाच गटातून रिंग रोड व रेल्वे जाणाऱ्या 7 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या लहान-लहान पट्ट्या शिल्लक राहात असून त्यात भविष्यात शेती करता येणार नाही, तसेच विकसितही करता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबाबत सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी केली.

त्याचबरोबर  रिंग रोडवर स्थानिकांना जास्तीतजास्त अॅक्सेस मिळावेत. त्याचबरोबर दोन्ही बाजूला 12 मीटरचे सर्व्हिस रस्त्याची तरतूद करण्यात यावी. जेणेकरून रस्त्यालगतच्या जमीन मालकांना फायदा होईल असेही डॉ. कोल्हे यांनी सुचविले.

रिंगरोड प्रकल्प आयसोलेटेड ठेवण्याऐवजी संपूर्ण विकास व्हावा या दृष्टीने व्हावा. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुरत-चेन्नई आणि चेन्नई-मुंबई ग्रीनफिल्ड मार्ग, मेट्रो, पुणे-शिरुर महामार्गावरील दुमजली पुलांसह होणारा 18 पदरी रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर चौपदरीकरण, पुणे नाशिक महामार्ग अशा सर्वच प्रकल्पांचा एकत्रित विचार करून इंटिग्रेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात यावा.

विशेष म्हणजे नुकतेच कोविड आजारावर उपचार घेतलेल्या डॉ. कोल्हे यांची प्रकृती पूर्णपणे बरी नसतानाही केवळ शेतकऱ्यांच्या समस्या व व्यथा शासनासमोर मांडण्यासाठी ते या बैठकीस जातीने उपस्थित होते. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पालकमंत्री पवार यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.