Pimpri News : पाणीटंचाईची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी शहरवासीयांची माफी मागावी – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात पाणीसाठा असतानाही गेल्या तीन वर्षांपासून भाजप सत्ताधा-यांच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्यासाठी आक्रोश करण्याची वेळ आली आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलन करणा-या देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाईची जबाबदारी स्वीकारून शहरवासीयांची माफी मागावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाने औरंगाबाद येथे काढलेल्या जलआक्रोश मोर्चावर राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी जोरदार टीका केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने औरंगाबाद येथे केलेले आंदोलन हे हास्यास्पद ठरले आहे. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. त्यातील अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही अशीच स्थिती आहे. आमची महापालिकेत सत्ता असताना शहरात कधीही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. योग्य नियोजन आणि चांगल्या पाणीपुरवठ्यासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता.

परंतू महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर अवघ्या दीडच वर्षांत शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले. पवना धरण भरलेले असतानाही केवळ निविदा काढणे, भ्रष्टाचार करणे, त्यातून स्वत:ची घरे भरणे यामध्ये गुंतलेल्या भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी शहराच्या पाणीपुरवठ्याचा अक्षरश: तीन तेरा वाजविले. नियोजनाच्या अभावामुळे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरातील जनतेवर जलआक्रोश करण्याची वेळ आली. शेकडो कोटींच्या निविदा काढल्यानंतरही भाजपाला शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करता आलेला नाही. हे अपयश भाजपच्या नेत्यांचे नव्हे काय? असाही प्रश्न गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे.

24 तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शहरवासियांना दिले होते. मात्र ते सत्ताकाळात दिवसातून एकवेळा देखील पाणी देऊ शकले नाहीत. खोटी आश्वासने देणे, भूलथापा मारणे आणि त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपनेत्यांचा धंदा असून जनता येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

फडणवीसांनी दखल घ्यावी

पिंपरी-चिंचवडकरांना सध्या जो जलआक्रोश करावा लागत आहे. त्याची फडणवीस यांनी दखल घ्यावी. तसेच पिंपरी-चिंचवडकरांना खोटे आश्वासन दिल्याबद्दल जाहीर माफी मागावी. तसेच आपल्या सत्ताकाळात ज्या पदाधिका-यांनी भ्रष्टाचार, लाचखोरी, खंडणीखोरी केली. त्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी. ज्या जनतेने अत्यंत विश्वासाने सत्ता तुम्हाला दिली होती. त्याचा हिशोब जनतेला देण्याची वेळ आलेली असल्याने नाहक इतर ठिकाणी राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलने करण्याऐवजी ज्या जनतेचा तुमच्या पदाधिकार्यां नी विश्वासघात केला त्याचे उत्तर अगोदर पिंपरी-चिंचवडकरांना द्यावे, असे आवाहनही गव्हाणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.