Shirgaon (Maval) : शिरगावच्या साईंच्या दर्शनाने भक्तांनी केला नववर्षाचा प्रारंभ

एमपीसी न्यूज –  नवीन वर्षानिमित्त प्रतिशिर्डी शिरगाव येथील साईमंदिरात लाखो साई भक्तांनी अलोट गर्दी करत साईबाबा दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती साई मंदिराचे मुख्य विश्वस्थ माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली.

१ जानेवारी दिवशी नवीन वर्ष असल्याने प्रत्येक जण चांगल्या कामाने सुरुवात करीत असतो. बाबांच्या आशीर्वादाने चांगल्या कामाचा प्रारंभ करू पाहत होता. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे मंदिर परिसर अलोट गर्दीने फुलून गेला होता.

लाखो भाविकांनी शिरगावला भेट दिली व दर्शनाचा लाभ घेतला. तसेच अन्नछत्रात हजारो भाविकांनी  महाप्रसाद घेतल्याची माहिती अन्नछत्राचे व्यवस्थापक जयेश मुळे यांनी दिली. दुपारची मध्यान आरती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश देवळे व सचिव सपना लालचंदाणी यांच्या हस्ते पार पडली दिवसभर मंदिरात साई भजनाचे कार्यक्रम पार पडले. गुरुवर्य पंडित विठ्ठल जगताप यांची अभंगवाणी व  भजन सम्राट पंडित बाळासाहेब वाईकर यांचे भजन गायनाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. सोमाटणे फाटा पासूनच दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.

वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने मंदिरात आकर्षक फुलांनी बाबांचा गाभारा सजवला होता. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत होती. शनिवारी साई मंदिर रात्री दोन  वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी  खुले ठेवण्यात आले होते. रात्री बारा वाजता संपूर्ण दिवे मालवून समईच्या मंद प्रकाशात नवीन वर्षाच्या पहिल्या क्षणाला दर्शनाचा लाभ घेऊन भाविकांनी आशीर्वाद घेतले. नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या चरणी नतमस्तक होवून आशीर्वादाने व्हावी, यासाठी रात्री ३००० च्या वर  साईभक्त शिरगावात दाखल झाले होते. शिरगाव पोलीस चौकीच्या वतीने सकाळपासून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी संस्थांचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी, अनिल देवकर, राकेश मुगळे, समीर शेख, रमेश फरताडे, लक्ष्मीकांत ठाकूरद्वारे, गणेश कपिले, विजय लोखंडे, मच्छिंद्र कापरे, अर्जुन दहिभाते, साकेत कारंजकर, विजय हुंबे, नवरतन शर्मा  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.