Vadgaon Maval : मी, निलेश लंके, सुनील शेळके या आम्हा तिघांचे ग्रहण अजित दादांनी सोडविले – धनंजय मुंडे

एमपीसी न्यूज – मी, आमदार निलेश लंके, आमदार सुनील शेळके या आम्हा तीन सूर्यांना ग्रहण लागले होते. मात्र अजित दादांनी विश्वास टाकल्यामुळे आमचे ग्रहण सुटले, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच मावळ तालुक्यात शेकडो कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मंत्री मुंडे बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार निलेश लंके, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील शेळके, कृष्णराव भेगडे, मदन बाफना, माऊली दाभाडे, भारती शेवाळे, बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, सुभाष जाधव,गणेश खांडगे, शंकरदादा शेळकेसह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीकडे पाहत मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, रोज सूर्य उगवतो, रोज मावळतो, मात्र पहिल्यांदाच मावळात आज तुमच्याकडे पाहिल्यावर सूर्य मावळलेला पाहीला नाही याची जाणीव होते. सुनील अण्णांनी मला मोठे भाऊ केले. दादांनी राज्याचा सामाजिक न्याय मंत्री केले. मंत्री या नात्याने जनतेच्या साक्षीने वाढदिवसानिमित्त शेळके यांना लाख लाख शुभेच्छा देतो. दादांनी या कार्यक्रमाला वेळ देणे साधेसोपे काम नाही. वाढदिवसाला वेळ देण्यापेक्षा सुनील शेळके यांच्यावर खूपच प्रेम आहे. राज्यावर दोन वर्षात किती संकटे आली तरी 756 कोटी निधी मावळला दिला यापेक्षा वाढदिवसाचं मोठे गिफ्ट असू शकत नाही.

सुनील शेळके आणि मी एकत्रित काम करतो आहे. तुम्ही आम्ही एकत्रित आहोत हे भविष्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुटुंब आहे. सुनील शेळके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होण्यापूर्वीच सुनील शेळके यांचे तिकीट अजित दादांनी फायनल केले. मी 2014 निवडणुकीत पडलो तरीही पडेल उमेदवाराला विधान परिषद विरोधी पक्ष नेते पद दिले. हे दुसरीकडे कुठेच होत नाही, हे फक्त इथेच राष्ट्रवादीमध्ये होते.

ही तरूणाई दिसते ही फक्त राष्ट्रवादीमध्ये दिसते. त्या तरूणाईचा विश्वास फक्त दादांवर आहे. आजच्या सारखा भाग्याचा दिवस कुठलाच नाही. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला तेव्हा आपल्या कुटुंबात जेवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा अधिक आनंद आज आपल्या लेकराचं भरभरून कौतुक ऐकून आई वडिलांना झाला असेल, असेही मुंडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.