Pimpri: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा उद्या पिंपरीत मोर्चा 

एमपीसी न्यूज – आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने उद्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून या मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. 

आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोरवाडीतील अहिल्यादेवी पुतळा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. शगुनचौक, काळेवाडी पुलावरुन पाचपीर चौक, आठवण हॉटेल समोरुन चिंचवड गावाकडे जाणा-या नदीवरील पुलावरुन केशवनगर मार्गे चिंचवडगाव चापेकर चौक, तेथून चिंचवडे नगरमार्गे, वाल्हेकरवाडी,  बिजलीनगर पुलावरुन मोर्चा  आकुर्डीतील तहसील कार्यालयावर धडकणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. विविध भागात घोंगडी बैठका घेण्यात येत आहेत.
सोशल मिडियावरही पोस्ट फिरत आहेत. एक धनगर, लाख धनगर या नावे फेसबुक पेजही उघडण्यात आले आहे.  समाज बांधवांचे 24 ऑगस्टचे आरक्षण आंदोलन कसे असावे या संदर्भात टिप्स देणारा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.

`होय मी येणार, तुम्ही पण या
सर्वांना सांगा 24 ऑगस्ट
धनगर समाजाची पायदळ
घेऊन येणार पिवळं वादळ
एक दिवस समाजासाठी
एक दिवस सगळी कामे बंद
24 ऑगस्ट मोर्चा यशस्वी करु
चलो पिंपरी! चलो पिंपरी !!
शुक्रवारी सकाळी 10 वाजता
तुम्ही या बाकीच्यांना पण आणा’

अशी समाजाला हाक देणारी भावनिक पोस्ट सोशल मिडियात व्हायरल झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर धनगर समाज महासंघाने ही भावनिक हाक दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.