IPL 2021 : धवन – शॉ यांची दमदार खेळी, दिल्लीचा चेन्नईवर 7 गडी राखून विजय 

एमपीसी न्यूज – आयपीएल चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 7 गडी राखून विजय मिळवला. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. चेन्नईने 20 षटकात 7 बाद 188 धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दिल्लीचा विजय सोपा केला. सामन्यात 85 धावांची खेळी केलेल्या शिखर धवनला सामनावीर ठरला.  

चेन्नईची सुरवात खराब झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिसला आवेश खानने शून्यावर पायचीत केले. त्याच्या पुढच्याच षटकात ख्रिस वोक्सने ऋतुराजला वैयक्तिक 5 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर सुरेश रैना आणि मोईन अली यांनी दणक्यात सुरुवात केली. मोईन अलीने नवव्या षटकात अश्विनला लागोपाठ दोन षटकार ठोकले. मात्र या षटकारानंतर अश्विनने त्याला तंबुचा मार्ग दाखवला. अलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडू आणि सुरेश रैनाने तेराव्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले.

 संघाचे शतक पूर्ण केल्यानंतर रैनाने आपले अर्धशतक साकारले. 16व्या षटकात रैना दुसरी धाव घेताना धावबाद झाला. रैनाने 4 षटकार आणि 3 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. धोनी शून्यावर बाद झाला. करनने 15 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्यात मदत केली. तर, जडेजा 26 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉंम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

प्रतिउत्तर दाखल दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दमदार सुरुवात केली. शॉने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शॉनंतर धवननेही आपले अर्धशतक साकारले. या दोघांनी अकराव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले. आक्रमक झालेल्या पृथ्वीला ब्राव्हाने बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या.

धवन शतकाकडे कूच करत असताना शार्दुलने त्याला पायचीत केले. धवनने 54 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 बळी तर, ब्राव्होने एक बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.