RCB vs CSK : धोनीची चेन्नई एक्सप्रेस डूप्लेसीच्या बंगलोर संघाने रोखली

बंगलोर संघाने गाठले अंकतालिकेत चौथे स्थान

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : रॉयल चॅलेंजर्सचा फॉर्म मध्ये आलेला विराट कोहली आणि चेन्नईच्या धोनीने पुन्हा नेतृत्वाची आपल्या खांद्यावर घेतलेली धुरा आणि त्यामुळे आलेले दोन्ही मातब्बर संघातले चैतन्य. अशा पार्श्वभूमीवर आजचा टाटा आयपीएल 2022 मधला 49 वा सामना  पुण्यात खेळवला गेला ज्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नई सुपर किंग्जला 13 धावांची मात दिली.

चेन्नई संघासाठी हा सातवा पराभव ठरल्याने त्यांचे या स्पर्धेतले आव्हान आता आणखीनच खडतर झाले आहे.त्याचवेळी बंगलोर संघाला मात्र या  विजयाने जणू बूस्टर डोस मिळाला आहे.आणि त्यांनी या विजयामुळे अंकतालिकेतही चौथे स्थान मिळवले आहे.

आज चेन्नईचा कर्णधार माहीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण बंगलोर संघाच्या डूप्लेसी आणि कोहलीने रॉयल  सुरुवात करत धोनीला आपला निर्णय चुकला की काय असे वाटण्यासारखी सुरुवात केली.या जोडीने 44 चेंडूत 62 धावांची सलामी देत खणखणीत सुरुवात दिली,हे दोघेही खास करून डूप्लेसी एकदम आक्रमक खेळत असतानाच धोनीने आपल्या नावाला जागत चतुराईने मोईन अलीच्या हातून डूप्लेसी बाद करत ही जोडी फोडली.

डूप्लेसीने 22 चेंडूत 4 चौकार आणि एक षटकार मारत 38 धावा केल्या, त्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने कोहलीला साथ देत पुढे खेळण्यास सुरुवात केली खरी, पण मॅक्सवेल आज काही वेल खेळला नाही.त्याने फक्त तीन धावा केलेल्या असताना हकनाक एक चोरटी धाव घेण्याची चूक त्याला नडली आणि धोनीने त्याला धावबाद करुन बंगलोर संघाला दुसरा धक्का दिला. आणि यातून सारवण्याआधीच मोईन अलीनेच कोहलीला 30 धावांवर बाद करुन बंगलोरची अवस्था 3 बाद 79 अशी केली.

मात्र या कठीण परिस्थितीतही महीपाल लोमरार आणि रजत पाटीदार यांनी डोके शांत ठेवत डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला,या जोडीने चौथ्या गड्यासाठी 43 धावांची बहुमूल्य भागीदारी केली,आणि बंगलोर संघाच्या डावाला आकार येतोय असे वाटत असतानाच रजत पाटीदार 21 धावा काढून प्रिटोरियसची शिकार झाला,मात्र महिपाल,दिनेश कार्तिक यांच्या उपयुक्त फलंदाजीमूळे बंगलोर संघाने आपल्या नावावर 173 धावा जमा करत चेन्नई संघाला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले.

कार्तिक 17 चेंडूत 2 षटकार आणि एक चौकार मारत नाबाद 26 धावा केल्या, तर लोमरारने 26 चेंडूत 42 धावा जोडून संघाला एक सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. चेन्नई साठी तीक्ष्णाने तीन तर मोईन अलीने दोन बळी घेतले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतूराज आणि कॉन्व्हे या जोडीने आधीच्या सामन्यातल्या चांगल्या सुरुवातीची पुनरावृत्ती करत 7व्या षटकाच्या आतच 50 धावांची चांगली सलामी देत दमदार सुरुवात केली,आणि आपला आत्मविश्वास किती बुलंद आहे याची जणू एक प्रचिती दिली, ही जोडी डोकेदुखी वाढवणार असे वाटत असतानाच शाहबाज अहमदने आपल्या पहिल्याच षटकात ऋतूराजला 28 धावांवर बाद करुन ही जोडी फोडली.

यावेळी चेन्नईची धावसंख्या होती 6.4 षटकात 1 बाद 54 आणि यात फक्त 5 धावांची भर पडलेली असतानाच रॉबिन उथप्पाला मॅक्सवेलने फक्त एक धावावर बाद करुन चेन्नईला दुसरा मोठा धक्का दिला.आणि पाठोपाठ त्यानेच अंबाती रायडूला चकवून त्याची दांडी गुल केली आणि चेन्नई संघाला तिसरा मोठा हादरा देत आपले फलंदाजीतले अपयश भरून काढणारी कामगिरी गोलंदाजीत करत या फॉरमॅट मध्ये अष्टपैलू खेळाडूंचे महत्व सिद्ध केले.या धक्क्याने चेन्नई संघाला आज तरी सावरण्यात यश आले नाही.

कॉन्व्हे आणि रायडूच्या बाद झाल्यानंतर आलेल्या मोईन अलीने पुढे प्रतिकार चालू ठेवला पण या जोडीला चौथ्या गड्यासाठी फक्त 34 धावांचीच भागीदारी करण्यात यश आले,आणखी एक अर्धशतक पूर्ण झालेले असताना कॉन्व्हे 56 धावा काढून हसरंगाची पहिली शिकार ठरला आणि चेन्नई संघ चांगलाच अडचणीत आला,त्यानंतर थोड्याच वेळात कर्णधार धोनी, मोईन अली आणि जडेजा एकापाठोपाठ एक बाद झाले आणि बंगलोर संघाला विजय खुणावू लागला.प्रिटोरियसने शेवटी शेवटी बॅट दांडपट्टयासारखी चालवण्याचा प्रयास केला खरा,पण त्यात जिंकण्याची ऊर्मी जाणवली नाही.

अखेर चेन्नईला विजयासाठी 13 धावा कमी पडल्या,आणि त्यांना आपल्या 20 षटकात फक्त 160 च धावा करता आल्या ज्यामुळे चेन्नई एक्सप्रेसला तीन विजयानंतर रोखण्यात बंगलोर संघ यशस्वी ठरला आणि याच विजयाबरोबर आपल्या आव्हानाला जिवंत ठेवण्यात ही.बंगलोर साठी हर्षल पटेलनी तीन तर मॅक्सवेलनी दोन बळी मिळवून चेन्नईला रोखून धरण्यात मोठी कामगिरी बजावली.चेन्नई संघाच्या एकापेक्षा एक बलाढ्य तीन फलंदाजांना तंबुत पाठवून बंगलोर संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलणारा हर्षल पटेल सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
8 बाद 173
कोहली 30,डूप्लेसी 38,लोमरार 42, पाटीदार 21 ,कार्तिक नाबाद 26
मोईन 30/2,तीक्ष्णा 27/3,प्रिटोरियस 42/1
विजयी विरुद्ध

चेन्नई सुपर किंग्ज
8  बाद 150
ऋतुराज 28,कॉन्व्हे 56,मोईन अली 34,प्रिटोरियस 13
हर्षल पटेल 35/2, मॅक्सवेल 22/2, हसरंगा 31/1,हेजलवूड 19/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.