Shirur Crime News : सत्तेत बसल्यानंतर महिलांवरील प्रश्नांचे गांभीर्य कमी झाले का?

शिरूरच्या घटनेवरून चित्रा वाघ यांचा सरकारवर निशाणा

एमपीसी न्यूज : शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात मंगळवारी रात्री महिलेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातले महत्त्वाचे नेते पुण्यात राहतात, त्यातील एकानेही या घटनेची दखल घेतली नाही. सत्तेत बसल्यानंतर महिलांवरील प्रश्नांचे गांभीर्य कमी झाले का ?  या घटनेवर सरकारची भूमिका काय आहे असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघ म्हणाल्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणल्याने तुमची जबाबदारी संपते का? आज त्या महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. त्याची जबाबदारी कोण घेणार ? बॉलीवूडला धक्का लागू देणार नाही असे म्हणता आणि तुमच्यासाठी ही सर्वसामान्य जनता महत्त्वाची नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संपूर्ण राज्यात लेकीबाळीवर अत्याचार सुरू आहेत. मागील काही दिवसात अहमदनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरात महिलांवर हल्ले झाले आहेत. महिलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार? शिरूर येथे घडलेल्या घटनेवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.