_MPC_DIR_MPU_III

chinchwad : आहारातून आरोग्याकडे

एमपीसी न्यूज – आपणाला मोसंबी खायला दिली तर आपण एका दमात बसल्या बैठकीला किती मोसंबी खाऊ शकता ? …… एक….? दुसऱ्या कोणी प्रेमाने सोलून दिले तर ….दोन अडीच मोसंबी.., यापेक्षा जास्त खाल्ली जाणार नाही, अन कोणाचे एवढे प्रेम उतूही जाणार नाही !

_MPC_DIR_MPU_IV

मात्र याच मोसंबीचा ज्यूस (रस) काढून दिला तर ! तर एक ग्लास अगदी सहज. आग्रहाने स्पेशल कोणी आणून दिला तर… दोन ग्लास.. तर नक्की पिऊ. मराठी गजलकार भाऊसाहेब पाटणकरांच्या गजलच्या भाषेत सांगायचे तर……. “मला तर तो रस नकोच होता…. मला तर तो रस नकोच होता पण… तू दिलेला रस, रस घेऊन घेतला नाही तर…. तुझा विरस होणार होता आणि नंतर तुझा, माझ्यातला ‘रस’ कमी होणार होता म्हणून प्यावा लागला. मोसंबीचा दोन ग्लास रस करण्यासाठी किती मोसंबी लागतात…?

तब्बल सात..ते..आठ.. माझ्या जिव्हेची तृप्ती फक्त एक किव्हा दोन मोसंबी खाऊन होणार होती पण तिथे सात-आठ मोसंबीचा ऐवज पोटात ओतला गेला तर काय पचेल का ..? नाही ना… मग..

फेसाळलेला रस काढलेला ग्लास समोर भरलेला त्यात आल्याचा रस पिळलेला.. पुन्हावरून चाट मसाला भरलेला… गरज नसताना स्ट्रॉ ही धरलेला.. एवढासा तो ग्लास तो किती नटवला… बाकी चवीने एवढा का सजवला… जड होणारच पचायला… स्नेहन, प्रीनन, तर्पण, ब्रूहण, दीपन, पाचन, व्यवायी, विकसी, आणि हृद्य असे हे सारे गुण एकाच वेळी एकाच ग्लासात व्यक्त व्हायला लागले तर रसाजिर्ण होणारच…!

फळे असतात चावून खायला एवढस मर्म सांगायला… एवढ हवे होते का घोळायला… असे हे ज्यूस पिणे म्हणजे… घशात ओतणे म्हणजे… स्वतः चे बत्तीस दात व जिभेवर अन्याय केल्यासारखे आहे. चव निर्माण करणाऱ्यावर व चव घेण्यासाठी ‘मी’ आहे, असे सांगणाऱ्या मी वर. आहारतील बदल आपण किती मान्य करायचे व किती अमान्य करायचे, किती बदलांना अंगवळणी पडायचे, कितीकडे दुर्लक्ष करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ तेवढे आपण आरोग्यापासून लांब जाऊ. माणसाचे आयुष्य आधुनिक शास्त्राच्या मदतीने वाढले जरी असेल पण नुसत्या संख्यात्मकरित्या वाढून काय उपयोग… जर त्याला निरोगी शरीर नसेल तर…गुणात्मक दर्जा देखील वाढला पाहिजे.

_MPC_DIR_MPU_II

जनावरांना काय खावे काय खाऊ नये याची उपजतच बुद्धी असते. विषारी पाला जनावर कधी खाणार नाही. त्यांना जेवढे पचेल तेवढे ते खातात. अन्न कोणते खावे काय खावे याबद्दल माणूस अजूनही अनभिज्ञ आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांची परीक्षा करून त्यातील भेसळ ओळखण्याची किमया जमली पाहिजे. यासाठी माणसाला बुद्धी मिळाली आहे. आयुर्वेदाने प्रत्येक पदार्थ व त्याचा शरीरावर काय परिणाम होतो याचा उहापोह केला आहे.

प्रत्येक बदलत्या आहार-विहाराचा अभ्यास करून आजची वैद्य मंडळी प्रत्येकाची प्रकृती, वय, ऋतू , पचनशक्ती, प्रदेश, मन आदींचा विचार करून प्रत्येकाचे पथ्यापथ्य योग्यरित्या सांगतात. पण आपल्याला वैद्य हा औषधापुरता हवा फक्त बाकी पथ्य-अपथ्यची आपल्याला काही गरज नाही, असेच सर्वांना वाटते आणि स्वतःची मनमानी सुरु ठेवतात. त्यामुळे स्वतः ठरवून आपल्या प्रकृतीला न मानवणारे सुद्धा खातात. याला समर्थ रामदासांनी ‘पढत मूर्ख’ असे म्हटले आहे. हेच सर्व रोगाचे मूळ आहे.

पूर्वी सणाचा व ऋतूचा विचार करून घरात अन्नपदार्थ बनवली जात असे. होळीला पुरणपोळी, गुढी पाडवा म्हणजे श्रीखंड, लग्नकार्य असले की लाडू, दिवाळीला चिवडा, चकली… गृह प्रवेश, वास्तुशांती असेल तर गोडधोड, पाहुणे आले तर पक्वान्न आज हे सर्व बदललेलं आहे. बाजारात केव्हा ही जा, पान दुकानात सुद्धा चकली-चिवडा मिळतो आहे. पाव, पाणीपुरी बनवताना होणारी स्वच्छता आपण बघत असालच.

कृत्रिम चवी, चटकमटक खाणे, वेळोवेळी खाणे कमीत कमी श्रमात व कमीत कमी वेळेत बनवलेले पदार्थ, शिळे अन्न, परान्न ही सर्व रोगाची मूळ आहेत. पण लक्षात कोण घेतं… कोणाला त्याची फिकीर…जमाने के साथ चलो असे उलट वैद्यांना सुनावतात नव्या युगातील बदल यांना हवे असतात पण स्वतः मात्र बदलायला तयार नसतात. म्हणून म्हटल सगळच बदललय…

डॉ. विशाल मिसाळ, (एम.डी.)
9226932435

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.