Different Marathi Movie: वेगळा अनुभव देणाऱ्या ‘झॉलीवूड’ला स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड

Different Marathi Movie: Special Jury Award for 'zollywood' which gives a different experience ही रंगभूमी अद्यापही विदर्भात मोठ्या प्रमाणावर झाडीपट्टी रंगभूमी म्हणून ओळखली जाते. झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे.

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रात नाटकांचा खूप मोठा असा प्रेक्षक आहे. शहरातील रंगमंचांवर सादर होणारे नाटक वेगळे, छोट्या गावांमधील साध्या रंगमंचांवर होणारे नाटक वेगळे तर विदर्भातील झाडीपट्टीतील म्हणून ओळखले जाणारे नाटक वेगळे असते. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या भागातील गावांमध्ये सादर होणा-या झाडीपट्टीतल्या नाटकांवर आधारित झॉलीवूड या चित्रपटाला विशेष सन्मानित करण्यात आले आहे.

‘झॉलीवूड’ या चित्रपटाने केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार आपला डंका वाजविला आहे. या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन तृषांत इंगळे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला फ्रान्समधील इंडियन फेस्टिव्हल ऑफ तौलौसमध्ये स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.

दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी स्वत: झाडीपट्टी या नाटकात बाल कलाकार म्हणून काम केलं आहे. त्यामुळेच हा नाट्यप्रकार विदर्भाव्यतिरिक्त अन्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी ‘झॉलीवूड’ची निर्मिती केली.

रंगभूमीवर प्रचलित असलेली विशेष करुन संगीत नाटके, काही प्रसिद्ध गद्य नाटके विदर्भातील त्या त्या भागातील कलाकार रंगभूमीवर सादर करतात. त्यात खास करुन प्रमुख भूमिका शहरातील रंगभूमीवरील प्रस्थापित अभिनेते करतात.

तर इतर सर्व भूमिका स्थानिक कलावंत करतात. केवळ रंगभूमीच्या प्रेमापोटी प्रसंगी पदरमोड करुनही हा नाट्यप्रकार अजूनही जिवंत ठेवण्यात या कलाकारांचे मोठे योगदान आहे.

ही रंगभूमी अद्यापही विदर्भात मोठ्या प्रमाणावर झाडीपट्टी रंगभूमी म्हणून ओळखली जाते. झाडीपट्टी ही जणू एक इंडस्ट्रीच आहे.

या प्रकारावर पहिल्यांदाच चित्रपट निर्मिती होत आहे. चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या हेतूने तृषांतनं १६व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर लेखन, कास्टिंग डिरेक्शनचा अनुभव घेत आता “झॉलीवूड” या चित्रपटाच्या रुपानं त्यानं पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.