Chakan : दिघी, चाकण, हिंजवडीतून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दिघी, चाकण आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी घर, हॉटेल आणि दुकानातून दागिने, मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 1 लाख 2 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत बुधवारी (दि. 10) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संगप्पा बावन्ना पांचाळ (वय 42, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या पत्नी मंगळवारी (दि. 9) घर बंद करून आजारी असलेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेल्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील तिजोरीमधून सोन्याची अंगठी, पैंजण आणि रोकड असा एकूण 30 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

प्रकाश ज्ञानेश्वर खराबी (वय 56, रा. चाकण) यांचे खराबवाडी येथे महाराजा हॉटेल आहे. बुधवारी (दि. 10) पहाटे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून हॉटेल मध्ये प्रवेश केला. हॉटेलमधून मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 4 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खालूंब्रे गावात बुधवारी (दि. 10) पहाटे आणखी एक चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून घरात येऊन घरातून 57 हजार 700 रुपयांचे मोबाईल फोन, घड्याळ असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी प्रदीप उत्तम मोरे (वय 32) यांनी फिर्याद दिली.

हिंजवडी येथील मदरसन कंपनीच्या लॉकर मधून कंपनीतील कामगार तरुणीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार 3 जुलै रोजी घडला. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कंपनीत मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे. त्यामुळे मोबाईल फोन कंपनीच्या लॉकरमध्ये ठेवावे लागतात. फिर्यादी तरुणीने देखील तिचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन लॉकरमध्ये ठेवला असता चोरट्याने लॉकर उचकटून मोबाईल पळवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.