Dighi Crime : हातउसने पैसे न दिल्याने एकाला बेदम मारहाण

0

एमपीसी न्यूज – हातउसने पैसे न दिल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाला लोखंडी पाईप, पीयूसी पाईप आणि काठीने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री साडेनऊ वाजता दाभाडे वस्ती, चऱ्होली येथे घडली.

सुनील कोंडीबा मुंगसे (वय 40, रा. दाभाडे वस्ती, च-होली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत शनिवारी (दि. 21) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमित पठारे, अजय परांडे (दोघे रा. च-होली), विक्रम ठाकूर (रा. सोळूगाव, पुणे) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित याने फिर्यादी यांना फोन करून हातउसने दोन हजार रुपये मागितले. पैसे देण्यासाठी फिर्यादी मुंगसे यांनी नकार दिला. त्यावरून अमित याने मुंगसे यांना फोनवर शिवीगाळ केली. तसेच ‘तू मला भेट मग तुला सांगतो’ अशी धमकी दिली.

शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मुंगसे दाभाडे वस्ती येथील त्याच्या नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी विक्रम तिथे आला. त्याने मुंगसे यांना काम असल्याचे सांगून हॉटेलच्या बाहेर बोलावून घेतले. हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या आरोपींनी मुंगसे यांना लोखंडी पाईप, पीव्हीसी पाईप आणि लाकडी दांडक्याने पायावर, पाठीवर बेदम मारहाण करून जखमी केले. आरोपी अमित याच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी अजय याच्या विरोधात एक गुन्हा दाखल आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III