Dighi Crime News : ‘तुम्ही पौर्णिमेच्या आत मरणार’ असे सांगून महिलेवर केला अघोरी जादूटोणा; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘घरात भूत आहे, तुम्ही पौर्णिमेच्या आत मरून जाल’, असे सांगून तिघांनी मिळून महिलेवर आघोरी जादूटोणा केला. त्यानंतर महिलेला पट्ट्याने मारून अगरबत्तीने जिभेला व ओठांना चटके दिले. महिलेकडून 35 हजार रुपये घेतल्यानंतर आणखी पैशांची मागणी केली. चाकूचा धाक दाखवून पुन्हा एक हजार रूपये जबरदस्तीने नेले. हा प्रकार 19 जून ते 1 जुलै या कालावधीत चौधरी पार्क, दिघी येथे घडला.

गौरव गणपत भोईर (वय 19, रा. नेवासा फाटा, अहमदनगर), अ‍ॅशली जोसेफ, तुषार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि. 5) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एक वर्षापासून बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्यांना बाहेरची करणी झाल्याचा संशय होता. ही बाब त्यांनी त्यांच्या बहिणीचा मुलगा आरोपी गौरव याला सांगितली. त्याने त्याच्या अन्य दोन मित्रांना फिर्यादी यांच्या घरी आणले.

त्या दोघांनी फिर्यादी यांच्या घरात भूत आहे व फिर्यादी पौर्णिमेच्या आत मरून जातील असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना हाॅलमध्ये बसवून त्यांच्या आजूबाजूला हळद व कुंकू टाकले.

आरोपी तुषार यांनी फिर्यादी यांना पट्ट्याने पाठीवर हातावर मारून जखमी केले. आरोपी अ‍ॅशली याने फिर्यादी यांच्या शरीरावरुन लिंबू उतरवले व अगरबत्ती पेटवून त्यांच्या जिभेला आणि ओठांना चटके दिले. फिर्यादी यांना अगरबत्तीचा धूर ओढण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 35 हजार रुपये घेतले. त्यानंतरही वारंवार फिर्यादी यांच्याकडे फोन वरून पैशांची मागणी केली. एक जुलै रोजी आरोपी अॅशली फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून पुन्हा एक हजार रुपये जबरदस्तीने नेले. तसेच हातात चाकू धरून फिर्यादी व त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 384, 394, 34, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 2 1 ख 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.