Dighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – बनावट चावीच्या सहाय्याने दोन वेगवेगळी एटीएम मशीन उघडून त्यातून एक लाखांचे सीपीयू आणि एस अँड जी कंपनीचे लॉक चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 24) सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास माऊलीनगर, दिघी आणि वडमुखवाडी च-होली येथे घडली.

सचिन शिवकिरण काळगे (वय 32, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळगे हे इलेक्ट्रोनिक पेमेंट अँड सर्विसेस या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील 150 एटीएमची देखभाल करण्याचे काम आहे.

गुरुवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी माउलीनगर, दिघी येथील एसबीआय बँकेचे एटीएम आणि वडमुखवाडी येथील साई मंदिराजवळ असलेले एटीएम या दोन एटीएम सेंटरमध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. बनावट चावीच्या सहाय्याने चोरट्यांनी एटीएम मशीन उघडून त्यातून सीपीयू आणि एस अँड जी कंपनीचे लॉक असा एकूण एक लाख रुपयांचा माल चोरून नेला.

याबाबत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.