Dighi gas blast News: दिघी गॅस स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल

या गॅस स्फोट प्रकरणात दोघांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – दिघी येथील गॅस स्फोट प्रकरणाबाबत 27 ऑगस्ट रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 9 ऑगस्ट रोजी सकाळी महादेवनगर, दिघी येथे घडली होती.

पोलीस उपनिरीक्षक आर. के. घीगे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अर्चना महेंद्र सुरवडे (वय 35, रा. महादेवनगर, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अर्चना यांचा या घटनेत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अर्चना यांनी त्यांच्या घरातील गॅस शेगडीचे बटन 8 ऑगस्ट रोजी रात्री सुरु ठेवले. त्यामुळे रात्रभर त्यातून गॅस बाहेर आला. 9 ऑगस्ट रोजी सकाळी घरातील लाईटचे बटन सुरु करताना घरात पसरलेल्या गॅसचा स्फोट झाला.

यामध्ये घराची भिंत अंगावर पडून शेजारी राहणा-या ज्ञानेश्वर मधुकर टेमकर (वय 40) यांचा मृत्यू झाला. या घटनेत 13 जण भाजले गेले. अर्चना देखील या घटनेत गंभीररित्या भाजल्या गेल्या. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गॅस एजन्सीकडून अहवाल आल्यानंतर तसेच साक्षीदारांचे जबाब घेऊन स्फोटाबाबत तपास केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.