Dighi : घटस्फोटाचा खर्च पत्नीला मागितल्यावरून पतीला-पत्नीच्या भावाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – एकमेकांशी पटत नसल्याने एकमेकांपासून वेगळे झालेल्या पती-पत्नीने घटस्फोट घेण्याचे ठरवले. वकिलांसमोर संमती देताना पत्नीने घटस्फोट घेण्यासाठी नकार दिला. त्यामुळे घटस्फोटाचे प्रकरण करण्यासाठी पतीने झालेला खर्च पत्नीला मागितला. यावरून पत्नीच्या भावाने त्याच्या एका मित्रासोबत मिळून पतीला मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री साडेआठच्या सुमारास गणेशनगर, बोपखेल येथे घडली.

धनंजय रामचंद्र दिसले (वय 44, रा. बोपखेल) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सूरज लक्ष्मण देवकर (वय 25, रा. बोपखेल) आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिसले आणि त्याच्या पत्नीचे आपसात पटत नाही. त्यामुळे त्यांची पत्नी माहेरी आरोपी भावाकडे राहत आहे. दिसले यांनी त्यांच्या पत्नीशी चर्चा करून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वकिलांना फी दिली व केस बनवली. पत्नीला घटस्फोटाला संमती देण्यासाठी बोलावले असता पत्नीने घटस्फोट घेण्यासाठी नकार दिला.

या कारणावरून दिसले आणि त्याच्या पत्नीचा वाद झाला. त्यामध्ये दिसले यांनी त्यांच्या पत्नीकडे घटस्फोटाची केस बनवण्यासाठी झालेला खर्च मागितला. तो खर्च देण्यासाठी पत्नीने नकार दिला. या कारणावरून पत्नीच्या आरोपी भाऊ सूरज याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून फिर्यादी दिसले यांना बेस बॉलच्या बॅटने मारहाण केली. यामध्ये डिसले जखमी झाले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.