Dighi : एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा; दोघांची प्रकृती गंभीर

एमपीसी न्यूज – वडमुखवाडी येथील एकाच कुटुंबायीत पाच जणांना अन्नातून विषबाधा झाली. ही घटना रविवारी (दि. 6) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

शिवलिगप्पा आरळीगिड (वय 65), शांताबाई आरळीगिड (वय 60), कलप्पा शिवलिगप्पा आरळीगिड (वय 35), धनश्री कलप्पा आरळीगिड (वय 6) व वीरभद्र परतबाधि (वय 26, सर्व रा.साई मंदिराजवळ, वडमुखवाडी) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.

मिळेळलेल्या माहितीनुसार, आरळीगिड कुटुंबीयांनी रविवारी सकाळी नाष्ट्यासाठी उपीट केले होते. तसेच पिण्यासाठी बाहेरून ताक आणले होते. नाष्टा केल्यानंतर शिवलिगप्पा व शांताबाई झोपी गेले. दरम्यान दुपारी दोघांना चक्कर येऊ लागली तसेच उलट्या होऊ लागल्या. काही वेळाने घरातील इतरांनाही त्रास होऊ लागला.

त्यांनी एका नातेवाईकाला फोन करून सांगितले. नातेवाईकाने दुपारी चारच्या सुमारास त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. त्यातील शिवलिगप्पा व शांताबाई यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विषबाधा नेमकी कशातून झाली हे काही तपासण्यांनंतर समोर येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.