Dighi : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट कुलमुखत्यारपत्र आणि त्याआधारे दस्त बनवून बांधकाम व्यावसायिकाची चार कोटी रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार च-होली बुद्रुक येथे घडली . 

हेमंत बागारेड्डी मोटाडु (वय 54, रा. कॅम्प, पुणे) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोज कुमार रमानी, अली अकबर जाफरी (दोघे रा. कॅम्प, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज कुमार रमानी यांची च-होली येथे 3.97 हेक्टर जमीन होती. ती जमीन त्यांनी 2005 साली कुलमुखत्यारपत्र आणि विकसन करारनामा करून हिरानंद प्रॉपर्टीज प्रा. लि. यांना दिली. हिरानंद प्रॉपर्टीज प्रा. लि. यांच्याकडून 2012 साली फिर्यादी हेमंत आणि त्यांच्या चार साथीदारांनी कुलमुखत्यारपत्र आणि विकसन करारनामा करून त्याबदल्यात मोबदला देऊन ही जमीन घेतली. मात्र त्यावेळी जमिनीच्या 7/12 उता-यावर मनोज रमानी यांचेच नाव होते.

7/12 उता-यावर नाव असल्याचा गैरफायदा घेत मनोज रमानी यांनी 1997 सालचे बनावट कुलमुखत्यारपत्र बनवले. त्याआधारे आरोपी अली अकबर जाफरी यांनी 2 कोटी रुपये किंमत असणारी जमीन केवळ 24 लाख रुपये देऊन खरेदी दस्त करून त्यांच्या नावावर करून घेतली. त्यानंतर पाच दिवसात अली अकबर जाफरी यांनी तीच जमीन 95 लाख 74 हजार 468 रुपये किमतीला प्रदीप बधे व आकाशदीप कौल यांना विकली. सध्या त्या जमिनीचे मालक म्हणून प्रदीप बधे आणि आकाशदीप कौल यांची नावे असून त्या जमिनीचा ताबा मात्र हेमंत मोटाडु यांच्याकडे आहे. यावरून एकदा कुलमुखत्यारपत्र बनविले असताना बनावट कुलमुखत्यारपत्र आणि विकसन करारनामा करून फिर्यादी हेमंत मोटाडु यांची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.