Dighi : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी जाधववाडी येथील एका सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर दिघी पोलिसांनी देखील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करून त्यांचा दरोड्याचा डाव उधळून लावला. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री अकराच्या सुमारास भोसरी-आळंदी रोडवर दिघी येथे घडली.

कुंडलिक देवराम शेखरे (वय 24), रामेश्वर सोपान पांचाळ (वय 28), गजानन प्रेमराव फाजगे (वय 19), दयानंद महादेव सुरवसे (वय 19, सर्व रा. भोसरी), शुभम विठ्ठल निर्मळे (वय 22), रुपेश ज्ञानेश्वर देवकर (वय 24, दोघे रा. आळंदी रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई गणेश कोकणे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानाच्या समोर भोसरी आळंदी रस्त्यावर काहीजण दुचाकीवर संशयितरित्या थांबले आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची तपासणी केली असता त्यामध्ये घातक हत्यारे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी तीन दुचाकी, दोन तलवारी, एक लोखंडी पालघन, तीन लोखंडी कोयते, सहा मास्क असा एकूण 81 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. सहा जणांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची आरोपींची कबुली दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.