Dighi : किरकोळ कारणावरून हॉटेल व्यावसायिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – हॉटेल जवळ कचरा पेटवल्याने त्या आगीमुळे हॉटेलच्या बाजूला असणा-या झाडांना नुकसान पोहोचू नये यासाठी एका वॉचमनला तिथे थांबवले. यावेळी झालेल्या शाब्दिक वादातून तरुणाने हॉटेल व्यवसायिकाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 11) सकाळी अकराच्या सुमारास आळंदी रोड वडमुखवाडी येथील चंद्रफुल गार्डन हॉटेल येथे घडली.

राजेंद्र चंद्रभान गुप्ता (वय 56, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे जखमी हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस फिर्याद दिली. त्यानुसार निखिल दत्तात्रय तापकीर (वय 28, रा. शिवनगरी, आळंदी रोड, वडमुखवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र यांचे आळंदी रोडवर वडमुखवाडी येथे चंद्रफुल नावाचे हॉटेल आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या हॉटेल मधील बाथरूममध्ये गेले असता त्यांना हॉटेलच्या कंपाउंडजवळ धूर येत असल्याचे दिसले. याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी त्यांच्या हॉटेलमधील एका वॉचमनला जाऊन बघण्यास सांगितले. त्यावेळी आरोपी निखिल याने त्याच्या जागेत कचरा पेटवला होता. या आगीमुळे हॉटेलच्या कंपाउंडजवळ असलेल्या झाडांना इजा पोहोचू नये यासाठी राजेंद्र यांनी वॉचमनला तिथेच थांबण्यास सांगितले. त्यावरून निखिल याने हॉटेल परिसरातील झाडे पेटवून देण्याची धमकी देत राजेंद्र यांना शिवीगाळ केली.

यावरून दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये निखिल कु-हाड घेऊन राजेंद्र यांच्या हॉटेलमध्ये धावून आला. त्याला घाबरून पळत असताना राजेंद्र पाय अडखळून पडले. त्यावेळी निखिल याने राजेंद्र यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजेंद्र जखमी झाले. याबाबत निखिल याच्या विरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राऊळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.