Dighi : दोन ठिकाणी छापे मारून बेकायदेशीर देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 1 ची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिघी येथे दोन ठिकाणी छापे मारले. साई पार्क, दिघी येथे मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे दारू विक्री करणा-यास अटक करून त्याच्याकडून हातभट्टी आणि देशी दारू जप्त करण्यात आली. तर दुसरी कारवाई वडमुखवाडी, च-होली येथील द्वारका हॉटेल येथे करण्यात आली. हॉटेलमधून बेकायदेशीररीत्या विक्री केल्या जाणारा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 13 हजार 412 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.

पहिल्या कारवाईमध्ये पोलिसांनी हेमंतकुमार शालीवाहन माने (वय 39, रा. गजानन नगर, दिघी) याला अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पथक दिघी परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, साई पार्क, दिघी येथे सार्वजनिक मोकळ्या जागेत एक व्यक्ती गावठी हातभट्टीची आणि देशी दारू विक्री करीत आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात छापा मारला. आरोपी हेमंतकुमार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून हातभट्टीची दारू, टॅंगो पंच देशी दारू, रोख रक्कम असा एक हजार 952 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुस-या कारवाईमध्ये पोलिसांनी विकास राम मारबले (वय 27, रा. लक्ष्मीनगर, मोशी) याला ताब्यात घेतले आहे. दिघी-आळंदी रोडवरील वडमुखवाडी, च-होली येथे द्वारका हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये बेकायदेशीररीत्या गिऱ्हाईकांना विदेशी दारू व बिअरची विक्री केली जात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी द्वारका हॉटेलवर छापा मारला. काउंटरवर असलेल्या विकास याला ताब्यात घेतले. पोलिसांनी हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेल्या टूबर्ग बिअर, मॅक्डोनाल्ड रम, मॅक्डोनाल्ड व्हिस्की, इंपिरियल ब्ल्यू व्हिस्की, बॅग पायपर व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, ऑफिसर्स चॉईस आदी कंपन्यांच्या 11 हजार 460 रुपये किमतीच्या 81 बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी देखील मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.