Dighi : रेडझोनमधील जमिनीच्या विक्री प्रकरणी दुय्यम निबंधक, तलाठ्यासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रेडझोनमधील जमिनीची विक्री करता येत नसतानाही परस्पर विकी करणाऱ्या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुय्यम निबंधक आणि तलाठी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिघी येथे घडली.

उध्दव दगडू गिलबिले, पंडित दगडू गिलबिले, लक्ष्मण दगडू गिलबिले, दुय्यम निबंधक गणेश वैकुंठे, तलाठी एस. डी. देशमुख (सर्व रा. वडमुखवाडी, चऱ्होली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मधुकर भिकू गिलबिले (वय 90, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मधुकर यांची वङमुखवाडी येथे अडीच एकर जमीन आहे. त्यातील एक गुंठा जमीन रेडझोनच्या हद्दीत गेली आहे. त्या जमिनीच्या कागदपत्रांवर इतर हक्कांचे शिक्के आहेत. त्यामुळे त्या जमिनीचा व्यवहार करता येत नाही. असे असतानाही 29 ऑगस्ट 2018 ते 15 सप्टेंबर 2019 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी मधुकर गिलबिले यांच्या मालकीची एक गुंठा जमीन बनावट कागदपत्रे तयार करून तिची बेकायदेशीररित्या विक्री केली. तसेच आरोपी वैकुंठे व देशमुख यांनीही या जमिनीच्या विक्रीबाबत बेकायदेशीररित्या नोंद करून भारत सरकारच्या आदेशाची पायमल्ली तसेच फसवणूक केली आहे. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.