Dighi : सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी साडेचारच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे घडली.

सायली आहेर (वय 20) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीच्या 60 वर्षीय आजीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती करण आहेर, सासरा अर्जुन आहेर, दीर आणि दोन नणंद (सर्व रा. गुजरनगर कॉलनी, डांगे चौक, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली आणि करण यांचा विवाह 11 मे 2018 रोजी झाला. विवाहाच्या वेळी सायलीच्या माहेरच्यांनी तीन लाख रुपये, मुलाच्या कापड्यासाठी पैसे आणि मुलीच्या दागिन्यांसाठी दीड लाख रुपये दिले. करण याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. तिला तिच्या मनाप्रमाणे पती मिळाला नाही, या कारणावरून ती सासरी नांदायला जात नाही. यामुळे करण याच्या घरच्यांनी सायलीला त्रास देण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला सासरच्या मंडळींनी दुचाकी घेण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. त्याप्रमाणे सायलीने माहेरच्या लोकांकडून पैसे आणून दिले. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिच्याकडे फ्लॅटची मागणी केली. यावरून तिचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून तिने सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास थेरगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून सायलीच्या आजीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.