Dighi News: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ‘द पॅक’ टीमला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे प्रथम पारितोषिक

Dighi News: Army Institute of Technology's 'The Pack' team wins first prize of Smart India Hackathon 'द पॅक'ने 'ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण' यावर 'युरेका' नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे.

एमपीसी न्यूज – दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ‘द पॅक’ टीमने स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक मिळवले आहे. ‘द पॅक’ने ‘ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण’ यावर ‘युरेका’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. अंतिम फेरीत 20 टीम पोहोचल्या होत्या. त्यात ‘एआयटी’ने हैदराबादच्या एमएलआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला मात दिली. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या वतीने 1 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत या हॅकेथॉनचे आयोजन केले होते.

या हॅकेथॉनमध्ये सॉफ्टवेअर प्रकारात 256 खासगी व सरकारी संस्थांमधून अनेक संघ सहभागी झाले होते. साधारणपणे एक लाख विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. विविध समस्यांवर उपाय करण्याचे सॉफ्टवेअर बनविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते.

‘एआयटी’च्या रिशव शर्माच्या नेतृत्वात अक्षय शर्मा, सत्य प्रकाश, हर्ष चौहान, दीपशिखा त्रिपाठी, शुवम कुमार यांच्या ‘द पॅक’ टीमने हे ‘युरेका’ सॉफ्टवेअर बनवले.

कोरोनामुळे शिक्षण ऑनलाइन झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि विविध ठिकाणाहून होणाऱ्या व्हिडिओ व्याख्यानाचा मोठा खर्च यामुळे ग्रामीण व आर्थिक मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

त्यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांनी एक अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. कमी इंटरनेट बँडविड्थमध्येही याचा वापर करता येतो. स्वयंचलित ऑनलाइन शिक्षणाच्या दिशेने हे पहिले पाऊल असणार आहे.

तसेच ‘युरेका’ अप्लिकेशनमधील सध्याच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरील सर्व सुविधा एकत्रितरित्या उपलब्ध असणार आहेत. ‘द पॅक’सह ‘एआयटी’च्या ‘हेक्साडा’, ‘माधवाज’ आणि लोरा एसवायएनसी या आणखी तीन संघानी अंतिम फेरीत स्थान मिळवले.

या यशाबद्दल ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट (निवृत्त) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भट म्हणाले, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे विजेतेपद आणि एक लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ‘पॅक’ टीमची कामगिरी अभिमानास्पद आहे.

केवळ भारतातच नाही, तर जगभरात ही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मानाची समजली जाते. विजेतेपदासह ‘एआयटी’च्या चार टीम अंतिम फेरीत गेल्या, हेदेखील आनंददायी आहे. एका टीमला विजेता होण्यापासून थोडक्यात हुलकावणी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून ‘एआयटी’ विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करते आहे. 2019 व 2020 या सलग दोन्ही वर्षी ‘केपीआयटी स्पार्कल’चे विजेतेपद, गेल्या वर्षी आयआयटी दिल्ली येथे झालेल्या ‘एनईसी हेकेथॉन’मध्ये पहिले तीनही क्रमांक ‘एआयटी’ला मिळाले.

हे यश विद्यार्थ्यांचे कष्ट, त्यांच्यातील गुणवत्ता दर्शवते. त्याचबरोबर शिक्षकांचे, प्रेरकांचे आणि सिनिअर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरले हे अधोरेखित होते. विविध प्रकारचे क्लब, अवांतर उपक्रम यातून विद्यार्थी घडताहेत.

या अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. त्यापेक्षाही आनंद आहे, तो म्हणजे समाजातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करताहेत. ‘ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण’ यावर ‘पॅक’ने काम केले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.