Dighi News: सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या घरी सव्वा लाखाची घरफोडी

फिर्यादी शिवकुमार आर्मीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे घर 29 ऑगस्ट रोजी पहाटे पावणे पाच ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजताच्या दरम्यान कुलूप लाऊन बंद होते.

एमपीसी न्यूज – बोपखेलमधील गणेशनगर येथे अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त लष्करी अधिका-याच्या घरी चोरी करून एक लाख 24 हजार 363 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे.

शिवकुमार कामलेश्वरी झा (वय 58, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवकुमार लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे घर 29 ऑगस्ट रोजी पहाटे पावणे पाच ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजताच्या दरम्यान कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला.

घरातील वेगवेगळ्या तीन बेडरूम मधील लोखंडी कपाटे उचकटून एकूण 35 हजार रुपयांची रोकड, 35 हजार 31 रुपयांचे सोन्याचे टीका, 12 हजार 492 रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट, 12 हजार 971 रुपयांचे सोन्याची साखळी, दोन हजार 969 रुपयांची सोन्याची चकती, 5 हजार 900 रुपयांची सोन्याची नथ, 20 हजारांची सहा घड्याळे असा एकूण एक लाख 24 हजार 363 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.