Dighi News: गॅस गळती स्फोट प्रकरण; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Dighi News: Gas Leak explosion case; Injured woman dies during treatment दिघी-भोसरी हद्दीवर असलेल्या अष्टविनायक सोसायटीमध्ये रविवारी (दि. 9) सकाळी गॅसचा भडका होऊन स्फोट झाला. घटनेत एकूण 13 जण जखमी झाले.

एमपीसी न्यूज – दिघी येथे गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात 12 जण जखमी झाले तर एकाचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तींमध्ये एक महिला 90 टक्क्यांपेक्षा अधिक भाजली होती. त्या महिलेचा बुधवारी (दि.12) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अर्चना महेंद्र सुरवाडे (वय 35) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी ज्ञानेश्वर मधुकर टेमकर (वय 40) यांच्या अंगावर भिंत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर अन्य 12 जण जखमी झाले होते. त्यामध्ये अर्चना सुरवाडे यांच्या घरातील पाच जणांचा समावेश होता.

अर्चना यांचे पती महेंद्र सुरवाडे, मुलगी आकांक्षा सुरवाडे (वय 15), दीक्षा सुरवाडे (वय 13), मुलगा अमित सुरवाडे (वय 8) हे सर्वजण जखमी झाले होते. त्यात अर्चना 90 टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या होत्या. त्यांची मोठी मुलगी आकांक्षा 60 टक्के भाजली होती. तर महेंद्र, दीक्षा आणि अमित हे 40 टक्क्यांपेक्षा कमी भाजले होते.

सुरवाडे कुटुंबातील सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी उपचारादरम्यान अर्चना यांचा मृत्यू झाला.

गॅस गळतीमुळे स्फोटाची घटना –

दिघी-भोसरी हद्दीवर असलेल्या अष्टविनायक सोसायटीमध्ये रविवारी (दि. 9) सकाळी गॅसचा भडका होऊन स्फोट झाला. घटनेत एकूण 13 जण जखमी झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी जखमींना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींमध्ये तीन पुरुष, तीन महिला, दोन मुले आणि पाच मुलींचा समावेश होता. त्यातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता.

हा स्फोट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक 103 मध्ये सुरवाडे यांच्या घरात झाला होता. शनिवारी रात्री सुरवाडे यांच्या घरातील गॅस सिलिंडर सुरु राहिला. रात्रभर सिलिंडरमधून गॅस गळती होत राहिली. रविवारी पहाटे घरातील व्यक्तींनी गॅस सुरु करण्याचा प्रयत्न केला असता गॅसचा स्फोट झाला. सुरवाडे कुटुंबातील पाचजण यात जखमी झाले.

या स्फोटाची दाहकता शेजारच्या फ्लॅट क्रमांक 102 मध्ये पोहोचली. त्या फ्लॅटमध्ये टेमकर कुटुंब राहत आहे. टेमकर पती-पत्नी, त्यांची दोन मुले देखील यात जखमी झाले आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी टेमकर यांच्याकडे श्री व सौ सातपुते आणि त्यांची दोन मुले असे चार पाहुणे आले होते. ते चौघे देखील या स्फोटात जखमी झाले. बुधवारी सुरवाडे यांच्या कुटुंबातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.