Dighi News : पत्नीच्या धमक्यांनी पतीचा मृत्यू; मृतदेहासह नागरिकांचा पोलीस ठाण्याबाहेर जमाव

एमपीसी न्यूज – पती-पत्नीतील भांडण हे (Dighi News) न्यायप्रविष्ट होते. तरी पत्नीने तिच्या नातेवाईकांसह मिळून पतीला भर रस्त्यात दमदाटी व धक्काबुक्की केली. यातच पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.13) दुपारी दिघी येथील कृष्णानगर येथे रस्त्यावर घडली आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपींना अटक केली नाही, या मागणीसाठी मयतांचे नातेवाईक हे मृतदेहासह पोलीस ठाण्याबाहेर बसले आहेत.

ऋषभ मुकुंद जाधव (वय 34, रा. दिघी) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मित्र मिलींद बाळासाहेब पाटील (वय 35) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पत्नी, सासू व सासरे दत्तात्रय तापकीर, भाऊ वेदांत दत्तात्रय तापकीर व दोन अळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

फिर्यादित म्हटल्या नुसार, पत्नी व मयत यांच्यात 2019 पासून खडकी न्यायालयात खटला सुरु होता. यातील खटल्याचा काहीअंशी निकाल हा आरोपी पत्नीच्या बाजूने लागला होता. त्यानुसार (Dighi News) दिघी पोलिसांनी फिर्यादी व मयत ऋषभ यांना पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी बोलावले व न्यायालयाने पत्नीला ऋषभच्या घरात राहण्यासाठी मान्यता द्यावी किंवा तिची इतर ठिकाणी सोय करावी असे आदेश दिल्याचे सांगितले.

Chinchwad News : राष्ट्रवादी चिंचवडची पोटनिवडणूक लढविणार का? अजितदादा म्हणाले…

त्यानंतर पत्नी एका पोलीस कर्मचाऱ्यासह ऋषभच्या घरी गेली व तिच्या नातेवाईकांनी आरडाओरड करत गोंधळ घालत ऋषभला शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी तेथून निघून गेले असता आरोपींनी ऋषभ यांना त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर घेराव घालून शिवीगाळ करत, तू पण तुझ्या वडिलांसारखाच मरशील, बघू कोणाचा धर्म जिंकतो, तुझा की माझा म्हणत धक्काबुक्की केली व खाली ढकलून दिले. यावेळी फिर्यादी धावत ऋषभ यांच्याकडे गेले असता ते बेशुद्ध पडले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपींना मयताची मेडिकल हिस्ट्री माहिती असतानाही त्यांनी जाणूनबुजूण मयताचे मानसिक खच्चीकरण केले; ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

काय होता नेमका वाद? – Dighi News

पत्नी ही दुसऱ्या धर्माचे घरात पालन करत होती; जे ऋषभ यांना मान्य नव्हते. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. याच भांडणातून आरोपी पत्नीने लग्नाच्या सहा महिन्यांनतर पतीचे घर सोडून माहेरी गेली व तिने न्यायालयात पती विरोधात खटला दाखल केला. ज्याचा शेवट हा पतीच्या मृत्यूने झाला आहे.

पत्नीसह नातेवाईकांवर गुन्हा

ऋषभ यांच्या मृत्यू प्रकरणी मिलिंद पाटील यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ऋषभ यांची पत्नी पूजा जाधव, तिची आई उज्वला तापकीर, वडील दत्तात्रय तापकीर, भाऊ वेदांत तापकीर आणि दोन महिलांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शनिवारी (दि. १४) मध्यरात्री दीड वाजता दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसाने धमकावल्याचा नातेवाईकांचा आरोप

दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी ऋषभ जाधव यांना धमकावले. त्यामुळे त्यांना धक्का बसून त्यात ऋषभ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. पोलीस अंमलदार कांबळे यांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

आरोपींवरील कारवाईसाठी मृतदेहासह नातेवाईक पोलीस ठाण्याबाहेर –

गुन्हा दाखल होऊन 24 तास झाले, तरी अद्याप आरोपीला अटक झाली नाही, म्हणून ऋषभ यांचे मित्र व नातेवाईक हे मृतदेहासह आज (शनिवारी) सकाळपासून दिघी पोलीस ठाण्याबाहेर थांबले आहेत.

स्मशभूमीत निघालेली अंत्ययात्रा पोहोचली पोलीस ठाण्यात

ऋषभ यांच्या मृत्यूला पोलीस अंमलदार संदीप कांबळे हे देखील जबाबदार असल्याचा आरोप ऋषभ यांच्या नातेवाईकांनी केला. शनिवारी सकाळी ऋषभ यांची अंत्ययात्रा दिघी येथील घरातून निघाली. त्यांच्यावर भोसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र मॅगझीन चौकातून ही अंत्ययात्रा थेट दिघी पोलीस ठाण्यात आली. ऋषभ यांचा मृतदेह शववाहिनीत ठेऊन नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. स्मशानभूमीत निघालेली अंत्ययात्रा अचानक पोलीस ठाण्यात आल्याने पोलीस अधिकाऱ्यांचा देखील गोंधळ उडाला. पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिघी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

जनक्षोभ शमविण्यात पोलीस अपयशी

ऋषभ यांच्या मृत्यूला पोलीस अंमलदार देखील कारणीभूत असल्याची मागणी करत ऋषभ यांचे नातेवाईक दिघी पोलीस ठाण्यासमोर जमले. अचानक आलेला जनक्षोभ हाताळताना दिघी पोलिसांची दमछाक झाली. उप आयुक्त, सहायक आयुक्त आल्यानंतर देखील नातेवाईकांनी माघार घेतली नाही. अखेर स्थानिक राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलिसांच्या मध्यस्थी नंतर हे प्रकरण मिटले.

याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र जाधव म्हणाले कि, नातेवाईकांनी दम दिल्यानंतर ऋषभ यांचा मृत्यू झाला. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनतर देखील नातेवाईक ऋषभ यांचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात आले. त्यांना सर्व बाबी समजावून सांगितल्या आहेत. पुढील कारवाई दिघी पोलीस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.