Dighi news: पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा; उपमहापौर हिराबाई घुले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवसांपासून दिघी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. विस्कळीत पाणीपुरवठायामुळे दिघीकर त्रस्त आहेत. त्यामुळे दिघीतील पाणीपुरवठा येत्या पाच दिवसांत सुरळीत करावा; अन्यथा कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा उपमहापौर हिराबाई घुले यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

भोसरीतील पंप हाऊसमधून दिघीला पाणीपुरवठा केला जातो. तेथील पाण्याची लेव्हल कमी झाली की दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. मागील आठ दिवसांपासून दिघीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. यापार्श्वभूमीवर उपमहापौर घुले यांनी सोमवारी (दि.12) पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता सुनील अहिरे, उपअभियंता दिनेश पाठक, विजय वायकर, चोवीस बाय सात योजनेचे काम करणारे कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.

उपमहापौर घुले म्हणाल्या, “दिघीतील पाणीपुरवठा आठ दिवसांपासून विस्कळीत आहे. नागरिकांचे खूप हाल झाले आहेत. लोकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही विस्कळीतपणा येत आहे. दिघीतील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा. नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये. नियमितपणे आणि उच्च दाबाने पाणी मिळाले पाहिजे. येत्या पाच दिवसांत दिघीतील पाणीपुरवठा सुरळीत करावा”.

त्यावर पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, “दिघीतील पाणी समस्येकडे मी स्वतः लक्ष घालतो. येत्या आठ दिवसांत दिघीत पाण्याची समस्या राहणार नाही. पाणी समस्या संपेल. पाणीपुरवठा सुरळीत होईल. भोसरी पंप हाऊसकडून वारंवार अडचणी येतात. त्यावर पण मार्ग काढला जाईल. अडचण येणार नाही. यासाठी प्रयत्न केला जाईल”, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.