Dighi News: दिघीत साकारतेय अत्याधुनिक प्रसृतीगृह; नगरसेवक विकास डोळस यांच्या पाठपुराव्याला यश

महापौर ढोरे, आमदार लांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन

एमपीसी न्यूज – दिघीकरांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अत्याधुनिक, सुसज्ज प्रसृतीगृहाचे काम हाती घेतले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे, महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (शनिवारी) कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यासाठी भाजप नगरसेवक विकास डोळस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

दिघीतील सर्व्हे नंबर 79 या जागेत प्रसृतीगृहाची अत्याधुनिक चार मजली इमारत बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये औषधांचे दुकान, स्वागत कक्ष, प्रतिक्षागृह, सुसज्ज प्रसुतीगृह, सोनोग्राफी रुम, शस्त्रक्रिया कक्ष, योगा कक्ष, डॉक्टर्स रुम, नर्सिंग रुम, प्रयोगशाळा, लिफ्टचा अंतर्भाव आहे. या प्रसृतीगृहामध्ये 26 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये जनरल, प्रायव्हेट, सेमी प्रायव्हेट खोल्यांची व्यवस्था असणार आहे.

याबाबतची माहिती देताना भाजप नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”दिघीत सुसज्ज प्रसृतीगृह होणार आहे. महिलांसाठी लसीकरण हॉल, योगा हॉल देखील असणार आहे. दिघी परिसरातील महिलासांसाठी हे प्रसृतीगृह सोयीस्कर होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

महिलांच्या प्रसृतीसाठी खासगी रुग्णालयात 70 हजार ते एक लाखाच्या आसपास खर्च येतो. महापालिकेच्या या प्रसृतीगृहात मोफत उपचार होणार आहेत. खासगी रुग्णालयाला लाजवेल असे अत्याधुनिक प्रसृतीगृह होणार आहे. यामुळे महिलांची चांगली सोय होणार आहे”.

”निवडून आल्यापासून या कामासाठी वारंवार पाठपुरावा केला. जागा ताब्यात घेऊन स्थायी समितीची मान्यता घेतली. या पाठपुराव्याला यश आले असून आता काम सुरु झाले आहे. लवकरात लवकर आणि दर्जेदार काम करुन घेणार असल्याचे नगरसेवक डोळस यांनी सांगितले”.

यावेळी ‘फ’ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसेविका निर्मला गायकवाड, हिराबाई घुले, सामाजिक कार्यकर्ते कुलदिप परांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.