Dighi News: ‘तो’ ट्रक चालक करायचा मालाची परस्पर विक्री; एका आठवड्यात तीन गुन्हे दाखल

पहिल्या घटनेत ट्रक चालक चोरट्यावर ट्रकमधील 160 टायर चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ट्रकमधील तेलाचे 112 डबे काढून त्याची परस्पर विक्री केल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

एमपीसी न्यूज – ट्रक चालक त्याच्या ट्रकमध्ये भरलेला माल परस्पर चोरून त्याची विक्री करायचा. हा प्रकार मागील आठवड्यात उघडकीस आला आहे. त्यानंतर आठवडाभरात त्याच्या विरोधात मालाची चोरी करून परस्पर विक्री केल्याचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्या ट्रक चालक चोरट्याला अटक केली आहे.

पहिल्या घटनेत ट्रक चालक चोरट्यावर ट्रकमधील 160 टायर चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ट्रकमधील तेलाचे 112 डबे काढून त्याची परस्पर विक्री केल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्याच ट्रक चालकाच्या विरोधात ट्रकमधून 400 सिमेंटच्या गोण्या चोरून विकल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

सुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. चिंबळी फाटा. मूळ रा. तिरुपटेलवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक केलेल्या ट्रक चालक आरोपीचे नाव आहे.

प्रदीप सोमदत्त शर्मा (वय 34, रा. मोशी) यांनी पहिल्या प्रकरणात 160 टायर चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. फिर्यादी शर्मा यांच्या कंटेनरवर (एमएच 12 एचडी 5793) आरोपी सुरेश चालक म्हणून काम करत होता.

ट्रान्सपोर्टचे मालक अनमोल सतीश वायचळ यांच्या मार्फत चाकण येथील ब्रिस्टोन इंडिया प्रा. लि या कंपनीमधून फिर्यादी यांच्या कंटेनरमध्ये 14 लाख 37 हजार 564 रुपये किमतीचे 421 टायर लोड केले.

हे टायर अंधेरी मुंबई येथे पोहोच करायचे होते. आरोपी चालकाने टायर मुंबई येथे पोहोच न करता भोसरी येथे कंटेनर थांबवून 160 टायर चोरी केले.

दुस-या प्रकरणात मनोजकुमार काकासाहेब शिंदे (वय 34, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी 112 तेलाचे डबे चोरल्याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी शिंदे आणि आरोपी राजोळे हे दोघेही चालक आहेत. शिंदे यांना खोपोली मधील तेलाच्या कंपनीमधून तेलाचे डबे वाहतूक करण्याची ऑर्डर मिळाली.

खोपोली येथील फ्रीगोरिफीको अलाना प्रा. लि या कंपनीमधून 20 टन वजनाचे तेलाचे डबे शिंदे यांनी आरोपी राजोळे याच्या ट्रकमध्ये भरून दिले. भोसरी परिसरात आरोपीने एक लाख 68 हजार रुपये किमतीचे 1 हजार 680 किलो वजनाचे 112 तेलाचे डबे परस्पर चोरी करून विकले.

तिस-या प्रकरणात पियुष भूपेंद्र त्रिवेदी (वय 40, रा. कोंढवा, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुरेश प्रकाश राजोळे हा २ ऑगस्ट रोजी फिर्यादी त्रिवेदी यान्ह्या ट्रकवर (एमएच 12 एफसी 6264) चालक म्हणून काम करत होता.

दिघी येथील मॅगझीन चौकातून आळंदी रोडने जात असताना ट्रकमधील डिलिव्हरीसाठी भरलेल्या एक लाख 10 हजार 400 रुपयांच्या 400 सिमेंटच्या गोण्या चोरून त्याची परस्पर विल्हेवाट लावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.