Dighi news: संत निरंकारी मिशनतर्फे स्नेहछाया बालकाश्रमामध्ये किराणा व अन्नधान्याची मदत

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे दिघी येथील स्नेहछाया बालकाश्रमामध्ये दोन महिन्याचा किराणा व अन्नधान्याची मदत देण्यात आली.

वृत्तपत्रांमध्ये प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत संत निरंकारी मंडळ भोसरी यांच्या वतीने स्नेहछाया प्रकल्पाला भेट देऊन स्नेहछाया प्रकल्पाचे संचालक प्रा.इंगळे सर यांच्याकडून प्रकल्पाविषयी माहिती करून घेण्यात आली. तात्काळ आवश्यक असणारा दोन महिन्याचा किराणा व अन्नधान्य त्याचबरोबर सॅनिटायझर आणि मास्क देण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अशा अनेक सेवाभावी संस्था अडचणीत आल्या आहेत. संस्थांना येणारा मदत निधी तसेच दानशूर व्यक्तींच्या भेटी कमी झाल्यामुळे या सेवाभावी संस्था आर्थिक अडचणीत आल्यामुळे मुलांचे हाल होत आहेत.

संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण लॉकडाउनच्या काळात सुद्धा समजातील अशा दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून त्यांना शक्य तेवढी मदत करण्यात आली. तसेच वेळोवेळां वाय. सी. एम. रुग्णालयाच्या गरजेनुसार रक्तदान शिबिर व प्लाझ्मादान देखील करण्यात येत आहे.

संत निरंकारी मंडळाचे अंगद जाधव तसेच त्यांचे सहकारी बाबासाहेब कमाले, मंगेश बडद, प्रशांत झगडे, अखिलेश लाहे, जयेश पवार यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.