Dighi News: दिघीत पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत, नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेराव

पाणीप्रश्नावर नगरसेवक विकास डोळस आक्रमक

एमपीसी न्यूज – दिघी परिसरातील पाणीपुरवठा मागील पंधरा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नगरसेवक विकास डोळस यांच्यासह संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना घेराव घातला.

दिघीतील काटेवस्ती, विजयनगर, दिघी गावठाणचा काही भाग, पाटील आळी, तापकीर आळी, समर्थनगर, चौधरनगर या परिसरातील पाणीपुरवठा मागील पंधरा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. काही नागरिकांना सहा दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत.

विस्कळीत पाणीपुरवठ्याचे कारण विचारले असता पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि प्लबर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नगरसेवक विकास डोळस आणि संतप्त नागरिकांनी अधिका-यांना घेराव घातला. तसेच तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ”दिघीतील पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून विस्कळीत आहे. लोकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. दिवसाआड पाणीपुरवठा असतानाही विस्कळीतपणा येत आहे. लोकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. असे होत असेल तर दररोज पाणीपुरवठा करावा. विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत अधिका-यांकडे विचारणा केली असता चोवीस बाय सात या योजनेची तपासणी चालू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत असल्याचे अधिका-यांकडून उत्तरे दिली जातात. महापालिकेने नागरिकांना मूबलक पाणी द्यावे. त्यानंतर योजनेची तपासणी करावी”.

 

 पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले म्हणाले, ”उच्च दाबाने पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. चोवीस बाय सात या योजनेची तपासणी केली जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात थोडासा विस्कळीतपणा येत आहे. दोन दिवसात ही समस्या संपून पाणीपुरवठा सुरळीत होईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.