Dighi news: दिघीत आठ दिवसांपासून कावळे मृत्युमुखी पडताहेत;संसर्गजन्य रोगाची शक्यता

; नागरिकांमध्ये घबराट

0

एमपीसी न्यूज – दिघीतील बी.यू. भंडारी गृहनिर्माण सोसायटी परिसरात मागील सात ते आठ दिवसांपासून कावळे मरून पडत आहेत. हवेतून कावळे खाली पडतात. दोन पायावरून अचानक एका पायावर उभे राहतात आणि मृत्युमुखी पडतात. कावळ्यांना फूड ‘पॉयजनिंग’ झाले असण्याची किंवा संसर्गजन्य रोगाची शक्यता पशु तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे दिघी परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिघीत बी.यू. भंडारी गृहनिर्माण सोसायटी आहे. तिथे झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरात मागील सात ते आठ दिवसांपासून 10 ते 12 कावळे मरून पडत आहेत. हवेतून कावळे खाली पडतात. दोन पायावरून अचानक कावळे एका पायावर उभे राहतात आणि मृत्युमुखी पडतात. दररोज एकाच ठिकाणी कावळे मरून पडत आहेत. या परिसरात पशुवैद्यकीय आणि वन विभागाच्या अधिका-यांनी पाहणी केली.

कावळ्यांना फूड पॉयजनिंग झाल्याचा किंवा संसर्गजन्य रोग असण्याची शक्यता पशुतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही गोष्ट हलक्यात घेऊ नये. यातून कदाचित दुसरा एखादा संसर्गजन्य रोग होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

_MPC_DIR_MPU_II

परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत कावळे उचलताना काळजी घेण्याचे आवाहन पशुतज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, कावळ्यांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला नसल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत.

याबाबत स्थानिक नगरसेवक विकास डोळस म्हणाले, “आठ दिवसांपासून दररोज एकाच ठिकाणी कावळे मरून पडत आहेत. दिवसाला 10 ते 12 कावळे मरत आहेत. कात्रजवरून पशुवैद्यकीय आणि वन विभागाचे अधिकारी आज पाहणीसाठी आले होते. कावळ्यांना फूड पॉयजनिंग झालेले असू शकते. कदाचीत यातून संसर्गजन्य रोग पण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि हे गांभीर्याने घेतले पाहिजे. पशु वैद्यकीय विभागाने पोस्टमार्टम रिपोर्ट लवकर मिळवावा. फूड पॉयजनिंगने कावळे मरतात की दुसरे कोणाचे कारण आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. संसर्गजन्य रोग असेल. तर, ते लवकर कळले पाहिजे. त्यामुळे भविष्यात होणारी हानी टाळता येईल”.

महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले, “दिघीत शुक्रवारपासून कावळे मरून पडत आहेत. पहिल्यादिवशी 10 कावळे मेले. त्यानंतर चार ते पाच कावळे दिवसाला मरत आहेत. मृत कावळ्यांचे नमुने शुक्रवारी, शनिवारी आणि आज पुन्हा तपासणीसाठी औंधला पाठविले आहेत. त्याचे रिपोर्ट अद्याप आले नाहीत. पक्षांमधील काय व्हायरल असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कावळे मरत असतील. रिपोर्ट आल्यानंतर नेमके कारण कळेल. बर्ड फ्ल्यूची लक्षणे नाहीत. नागरिकांनी कावळ्यांना हात लावू नये. आरोग्य विभागाचे कर्मचारी कावळे घेवून जात आहेत. त्याची विल्हेवाट लावत आहेत. घाबरण्याचे काही कारण नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment