Dighi : भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चऱ्होली- निरगुडी रस्त्यावर झाला.

नामदेव नारायण दुरगुडे (67, रा. यमुनानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. तर, त्यांची मुलगी निर्मला अनिल पिसे (42, रा. निगडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. निर्मला यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 10) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला आणि त्यांचे वडील नामदेव हे चऱ्होली येथे एका नातेवाईकांच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते दुचाकीवर माघारी येत होते. दरम्यान, चऱ्होली- निरगुडी रस्त्यावरील दाभाडेवस्ती येथे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत दोघेही दुचाकीवरून उडून रस्त्यावर आपटले. यावेळी नामदेव यांच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, निर्मला रस्त्यावर आपटल्याने त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.