Dighi : सैन्य दलाच्या ट्रकला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवली. तसेच रस्त्याने जात असलेल्या सैन्यदलाच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 30) पहाटे अडीचच्या सुमारास आळंदी-पुणे रोडवर दिघी येथे घडली.

याप्रकरणी ट्रेनिंग बटालियन टू दिघी कॅम्पचे कुलदीप अवतारसिंग (वय 29) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोपेड दुचाकीवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी यादव असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अक्षय दिवाण (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) जखमी झाला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप दिघी येथील ट्रेनिंग बटालियन टू येथे कार्यरत आहेत. गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास कुलदीप 04 डी 161063 एम हा सैन्यदलाचा ट्रक घेऊन जात होते. आळंदी पुणे रस्त्यावर दिघी येथे अक्षय दिवाण आणि संभाजी यादव हे दोघे एका मोपेड दुचाकीवरून (एमएच 14 / इ टी 8551) भरधाव वेगात आले. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांनी कुलदीप यांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान संभाजी यादव यांचा मृत्यू झाला. तर अक्षय दिवाण गंभीर जखमी झाला. याबाबत कुलदीप यांनी दिघी पोलिसांना माहिती देत मोपेड चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.