DIGISHIELD : तरुण मराठी उद्योजक करतोय अमेरिकेतील 40 टक्के रुग्णांच्या वैद्यकीय माहितीचे व्यवस्थापन

DIGISHIELD: A young Marathi entrepreneur manages the medical information of 40 percent of patients in the United States डाॅक्टर आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'डिजिशील्ड' अ‍ॅप विकसित

 एमपीसी न्यूज – कोरोना बाधित अथवा संबंधित लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा तसेच त्यांना व डाॅक्टरांना संभाव्य कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी मदत व्हावी यासाठी संकेत बराले या तरुण मराठी उद्योजकाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर कार्य करणारे अनोखे ‘डिजिशील्ड’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. विशेष म्हणजे संकेत बराले यांची ‘फिग एमडी इनकार्पोरेटेड, अमेरिका’ ही कंपनी गुगल व्हेन्चरच्या सहाय्याने अमेरिकेतील सुमारे 40 टक्के रुग्णांच्या आरोग्यविषयक माहितीचे व्यवस्थापन करते. 

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना खासगी डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र काही रुग्ण लक्षणे लपवत असल्यामुळे तसेच अजानतेपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे रुग्णांसहीत संबंधित डॉक्टर आणि इतरांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे  डॉक्टर त्यांचा सहकारी स्टाफ आणि रुग्णालयात येणाऱ्या ‘नॉन  कोविड’ रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम उपाय ठरू शकेल असे अनोखे ‘डिजिशील्ड’ नावाचे ॲप संकेत बराले यांनी विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित असलेले हे ॲप डॉक्टर आणि रुग्ण यांच्या सुरक्षेची ढाल ठरु शकते.

‘डिजिशील्ड’ कसे काम करते?

क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येऊ इच्छिणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांकडून या ॲपव्दारे एक लिंक पाठवली जाते. रुग्णाने ही लिंक ओपन केल्यावर ‘डिजिशील्ड’चा ‘एआय’ एजंट त्याच्याशी चॅटिंग करत नाव, वय, पत्ता, आजार व लक्षणे, ‘क्लिनिकल हिस्ट्री’ आदी माहिती तसेच त्याच्या चेहऱ्याचा, जिभेचा फोटो आणि आवाजाचे सॅम्पल घेतो. त्यानंतर अवध्या काही मिनिटांत या सगळ्या माहितीचे, तसेच सदरचा रुग्ण कंटेन्मेंट झोन मध्ये आहे का? याचे ‘एआय’ अल्गोरिदम वापरुन विश्लेषण केले जाते.

‘लो रिस्क’ असलेल्या रुग्णांना काही मिनिटात एक ओटीपी पाठवला जातो व त्या रुग्णाला लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेन्ट दिली जाते.

‘हाय’ व ‘मॉडरेट रिस्क’ असलेल्या रुग्णांच्या उपचाराच्या पहिल्या टप्प्यात टेलिमेडिसीन वापर करण्यास डॉक्टरांना सुचवले जाते.

त्यानंतरही उपचाराची गरज पडल्यास त्या रुग्णाला ‘ओपीडी’ शिवाय इतर वेळी बोलावण्यासाठी सुचवले जाते. डॉक्टरांना अधिक सुरक्षा साधनांचा वापर करीत तपासणी व उपचाराचा पर्याय वापरता येईल.

डाॅक्टर आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी फायदेशीर 

डिजिशील्ड अ‍ॅपच्या मदतीने डाॅक्टर रुग्णांच्या लक्षणांनुसार त्यांचे वर्गीकरण करून योग्य तो सल्ला देऊ शकतात तसेच फोन संभाषणातून औषधांची माहिती देऊ शकतात. अगदीच गरज भासल्यास आणि कोरोना संबंधित लक्षणे दिसत नसल्यास डाॅक्टर संबंधित रुग्णाला दवाखान्यात बोलून आवश्यक उपचार देऊ शकतात.

कोरोना या विषाणूच्या अभूतपूर्व संकटामुळे खासगी दवाखाने सुरू करण्यास डाॅक्टर धजवत नाहियेत तसेच खासगी डाॅक्टर कोरोना रुग्णांवर उपचार देखील करू शकत नाहीत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रुग्ण आणि डॉक्टर यांना या अ‍ॅप्लिकेशनचा फायदा होणार आहे.

काय आहेत ‘डिजिशील्ड’चे फायदे –

  • क्लिनिकमध्ये येण्यापूर्वीच डॉक्टरांना प्रत्येक श्रेणीतील रुग्णाच्या स्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो.
  • हाय रिस्क मधील रुग्णाचा अजाणतेपणे होऊ शकणारा थेट संपर्क टळल्याने डॉक्टरांप्रमाणेच तेथील कर्मचारी व अन्य रुग्णांचा संभाव्य धोका टळतो.
  • ‘मी दवाखान्यात गेलो व तिथे कुणी कोरोनाबाधित रुग्ण असेल, तर मलाही संसर्ग होऊ शकतो’ ही दवाखान्यात जाऊ इच्छिणाऱ्यांची भीती कमी होऊ शकेल.
  • ‘नॉन कोविड’ रुग्णांना तातडीने व सुलभपणे उपचार मिळू शकतात.
  • डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहित असताना त्याचवेळी हाय / मॉडरेट रिस्क असलेल्या रुग्णाच्या मोबाईलवरही प्रिस्क्रिप्शन पोहोचेल.
  • रुग्णांच्या एकत्रित डेटाचे AI इंजिनव्दारे अचूक विश्लेषण होत असल्याने शहराच्या एखाद्या भागात कोणता आजार, साथ बळावतेय ते लगेच समजेल. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवणे शक्‍य होईल.

कोण आहेत संकेत बराले ?

संकेत बराले हे ‘फिग एमडी इनकार्पोरेटेड, अमेरिका’ या कंपनीचे संस्थापक आहेत. ही कंपनी गुगल व्हेन्चरच्या सहाय्याने अमेरिकेतील सुमारे चाळीस टक्के रुग्णांच्या आरोग्यविषयक माहितीचे व्यवस्थापन करते.

डिजिशील्ड या अ‍ॅपचे व्यवसाय विकास अधिकारी राकेश जोंधळे यांनी सांगितले की, या अ‍ॅपच्या माध्यमातून रुग्ण व डॉक्टर यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाऊ शकते.  अ‍ॅप्लिकेशन मधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे उत्तर देणारा सहाय्यक सर्व आवश्यक प्रश्नांची उत्तरे रुग्णांकडून मिळवून डॉक्टरांना देतो. डॉक्टर या माहितीच्या मदतीने रुग्णांचे हाय, माॅडरेट व लो रिस्क मध्ये वर्गीकरण करून योग्य सल्ला देतात व गरज भासल्यास रुग्णालयात तपासणी साठी बोलावतात. या अ‍ॅपमुळे रुग्ण व डॉक्टर यांचा थेट संपर्क होत नसल्याने एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे असली तरी संसर्गाचा धोका कमी होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.