Nigdi : दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज – दान पराधीन तर त्याग स्वाधीन आहे. दान श्रावकांनी द्यायचे असते तर त्याग मुनीराज करतात. दान करुन पापाचे व्याज चुकवले जाते मात्र पापाचे मूळ त्यागाने नष्ट होते, असे विचार उत्तम त्याग या लक्षणाविषयी बोलताना पुलकसागर महाराज यांनी शुक्रवारी (२१ सप्टेंबर) व्यक्त केले. 

निगडी प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने चातुर्मासानिमित्त दशलक्षण पर्व महोत्सव सुरु असून आठवे लक्षण म्हणजे उत्तम त्याग याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराजांनी अनेक उदाहरणांसह त्यागाची महती वर्णन केली. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार विशेष उपस्थित होते.  सकल वर्षा योग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल,  कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अजित पाटील, वीरेंद्र जैन, भूपाल बसन्नावार, सुरगोंडा पाटील, चकोर गांधी, सुदीन खोत, विजय भिलवडे, संजय नाईक, जितेन शहा, वीरकुमार शहा, सुजाता शहा, प्रकाश शेडबाळे, अदिनाथ खोत आदी उपस्थित होते.

यावेळी महाराज पुढे म्हणाले की, जीवनात काही गोष्टींचा त्याग होऊ शकतो, तर काही गोष्टी दान करायच्या असतात. राग, द्वेष यांचा त्याग करायचा तर ज्ञान, अभय, क्षमा यांचे दान द्यायचे असते. मात्र काही गोष्टींचा त्याग आणि दान दोन्ही होते, ते म्हणजे लक्ष्मी, घर, वैभव. दान करण्यासाठी ती गोष्ट आधी आपल्याकडे असावी लागते. म्हणजेच दानासाठी काहीतरी जोडावे लागते. मात्र त्यागात सर्वस्व द्यावे लागते. त्यागाने धनाचा मोह पूर्णपणे संपतो.

दान करताना तीन गोष्टींचे भान ठेवावे लागते. एक म्हणजे कोणाला कमी लेखण्यासाठी दान करु नये.  चांगले करा आणि विसरुन जा. दुसरे म्हणजे दान केल्याचा गर्व ठेवू नका. तिसरे म्हणजे बदल्याची भावना ठेवू नका. मी इतके दिले तर मला तितके मिळेल हा विचार ठेवून दान करु नका. जो जास्तीत जास्त त्याग करतो त्याचे तितकेच उत्थान होते. इच्छांवर अंकुश ठेवल्यास उत्तम स्थान प्राप्त होते.

मन में श्रद्धा, भक्ती लेकर जो तू दान करेंगा, उपरवाला तेरा खजाना रातोरात भरेंगा या वचनावर विश्वास ठेवा. मात्र अपात्री दान देऊ नये. ज्याला जरुरी आहे त्यालाच दान द्यावे. तसे केल्यास तुमची देखील वृद्धी होते. त्यामुळे देते रहो, बहते रहो या गोष्टीवर कायम विश्वास ठेवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.