Dilipsab don’t know about his brother’s demise: ‘दिलीपसाबना त्यांच्या भावांच्या मृत्यूबद्दल सांगितले नाही’

इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे ते अनेक दिवस रुग्णालयात होते, हे देखील दिलीपसाबना सांगण्यात आले नव्हते.

एमपीसी न्यूज – ‘ट्रॅजेडी किंग’ असे ज्यांना आदराने संबोधले जाते ते म्हणजे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार. दिलीपकुमार यांनी पन्नासच्या दशकातच चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ते सुमारे पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ अभिनय करत होते. ज्यांना आदराने सगळी चित्रपटसृष्टी दिलीपसाब असे म्हणते अशा दिलीपकुमार यांचे सध्या वय 97 वर्षे आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन लहान भावांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

अवघ्या 13 दिवसांत त्यांचे दोन्ही भाऊ अस्लमखान आणि अहसानखान हे जग कायमचे सोडून गेले. शोकांतिका म्हणजे दिलीप कुमार यांना त्यांच्या भावाच्या निधनाबद्दल माहित नाहीये. 97 वर्षीय दिलीप साहेबांचे वय बघता त्यांना अशा वेदनादायक बातम्यांमुळे खूप त्रास होऊ शकतो, असे त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितले आहे.

इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे ते अनेक दिवस रुग्णालयात होते, हे देखील दिलीपसाबना सांगण्यात आले नव्हते. कारण दिलीपसाहेब यांची बिग बींवर खूपच माया आहे, ते त्यांना मनापासून आवडतात.

दिलीप साहेबांचे धाकटे भाऊ अहसान खान यांच्या अंत्यसंस्काराबाबत सायरा बानो म्हणाल्या की, ‘दिलीप साहेबांचे पुतणे इम्रान आणि अयूब यांनी त्यांना सुपुर्द-ए-खाक केले. आम्हाला वाटले होते की, ते लवकरच बरे होतील, कारण 15 ऑगस्टपासून ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात होते. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी देखील स्थिर झाली होती. परंतु, मृत्यूच्या आदल्या रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती’.

अहसान खान यांच्यापूर्वी म्हणजे 21 ऑगस्ट रोजी त्यांचे सर्वात लहान भाऊ अस्लम खान यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. दोन्ही भावांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांची ऑक्सिजनची पातळीही घसरली होती. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

अहसान खान आणि अस्लम खान त्यांची बहीण फरीदा (ज्या पूर्वी अमेरिकेत राहत होत्या) यांच्यासोबत राहत होते. त्यामुळे दिलीप कुमार आणि सायरा यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका नव्हता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.