Diploma Admission : थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेशाच्या पात्रतेत बदल, ‘असा’ आहे नवा नियम

एमपीसी न्यूज – थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या इ. बारावीमध्ये भौतिकशास्त्र/ गणित / रसायनशास्त्र / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ जीवशास्त्र / इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस / बायोटेक्नॉलॉजी / टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट / ॲग्रिकल्चर/ अभियांत्रिकी ग्राफिक्स/बिझनेस स्टडीज/ एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यांकन व निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या गुणपत्रकाच्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना दहावी व बारावीच्या गुणांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये शिकण्याचा पर्याय यावर्षी राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या ज्या प्रथम वर्षाच्या आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) आरक्षित जागा रिक्त राहतील. अशा जागा दुसऱ्या वर्षीदेखील थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठीही ईडब्ल्यूएससाठी आरक्षित राहतील. त्यामुळे ईडब्ल्यूएससाठी द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठींच्या जागांमध्ये वाढ होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.