Pune News : विद्यापीठात सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भात पदविका अभ्यासक्रम

ध्रुव एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

एमपीसी न्यूज : विविध प्रकारच्या अक्षमता (person with disabilities) असणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहाच्या बरोबरीने शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकांसाठी सर्वसमावेशक (inclusive) शिक्षण हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे या विषयात काम करणाऱ्या ‘ध्रुव एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’ च्या मदतीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

या संदर्भातील सामंजस्य करार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘ध्रुव एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’ यांच्यामध्ये ८ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, डॉ. सुधाकर जाधवर, शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मेघा उपलाने, ध्रुव फाउंडेशनच्या अध्यक्षा माधवी पटवर्धन, उपाध्यक्षा शोभना भिडे आदी यावेळी उपस्थित होते.

याबाबत बोलताना डॉ. मेघा उपलाने म्हणाल्या, सर्व शिक्षकांना व पालकांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. नियमित अभ्यासक्रमात हा विषय शिकवला जात नाही म्हणूनच हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ठराविक श्रेयांकही मिळणार आहेत. या अभ्यासक्रमात इंटर्नशिपही देण्याचा प्रयत्न केला जाईल.

विद्यापीठात अभ्यासक्रम ठरवत असताना त्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला जातो. या अभ्यासक्रमामुळे शिक्षकांना सर्वसमावेशक शिक्षणसंदर्भात चांगलं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे.

– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.