Bhosari : पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी सहकारी बँकेचा संचालक पाच वर्षांसाठी अपात्र

एमपीसी न्यूज – सहकारी बँकेतील पदाचा गैरवापर करून खात्यावर रक्कम नसताना देखील धनादेश पास करून घेतल्याचा ठपका ठेवत अपर निबंधक कार्यालयाने अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे संचालक नंदकुमार विठोबा लांडे यांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीची मुदत संपेपर्यंत अपात्र ठरवले आहे.

लांडेवाडी येथील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या 2016-17च्या लेखापरीक्षण अहवालात तत्कालीन अध्यक्ष नंदकुमार विठोबा लांडे यांनी त्यांच्या चालू खात्यावर 14 धनादेश पारित केले. खात्यावर शिल्लक रक्कम नसताना देखील हा व्यवहार त्यांनी केला आहे. हे सर्व धनादेश लांडे यांच्या नातेवाईकांच्या दाखल केलेल्या ठेव पावत्यांवर कोणतेही तारण कर्ज मंजूर नसताना पारित करण्यात आले आहेत. बँक स्तरावरून लांडे यांना हेतुपूरस्सर आर्थिक मदत होण्याच्या उद्देशाने कार्यवाही झाली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नागरी सहकारी बँकांच्या संचालक व त्यांच्या नातेवाईकांना बँकेकडून केवळ मुदत ठेव व विमा पॉलिसी तारणावर कर्ज घेता येते, असे असताना देखील लांडे यांनी कर्ज मिळविण्यासाठी नातेवाईकांच्या ठेव पावत्या दाखल केलेल्या आहेत. त्यावर बँकेने कोणतेही तारण कर्ज मंजूर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम शिल्लक नसताना देखील धनादेश पारित करण्यात आले आहेत.

या प्रकरणामध्ये नंदकुमार लांडे दोषी आढळले असून अण्णासाहेब मगर सहकारी बँकेच्या संचालक पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहेत. संचालक मंडळाचा पुढील पाच वर्षाचा कालावधी संपेपर्यंत त्यांना सदस्य म्हणून देखील निवडून येता येणार नसल्याचे अपर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.