Pimpri : पाणी कपात रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. दरम्यान, टँकर लॉबीला फायदा व्हावा यासाठीच भाजपने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा नियमित केला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरामध्ये पाणी टंचाईचे कारण सांगून विभागवार आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. परंतु, एक दिवस पाणी न आल्यामुळे पुढच्या दिवशीही त्या विभागात कमी दाबाने व विस्कळीत पाणी पुरवठा होतो. म्हणजे प्रत्यक्षात नागरिकांना दोन दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागतो.

दापोडी, वाकड इत्यादी भागामध्ये सातत्याने अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांना नाईलाजाने आर्थिक भूर्दंड सहन करून पाण्याचे टँकर मागवावे लागतात. नियोजन शून्य आणि भोंगळ कारभारामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत करून पाणी कपातीचा मनमानी निर्णय सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडले आहे. विशेषतः महिला भगिनींना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. लहान, मोठ्या सर्व सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे.

शहरातील टँकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपा आणि महापालिका प्रशासनाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. तातडीने ही पाणी कपात रद्द करावी, तसेच शहरात सर्वत्र समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा काटे यांनी दिला आहे. याबाबत महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.