Pimpri News : शेजाऱ्याला पाण्याची मोटार बंद करण्यास सांगितल्यावरून वाद

भांडणे सोडवणा-या महिलेचा हात फ्रॅक्चर

एमपीसी न्यूज – नळाला पाणी येत नसल्यामुळे शेजा-याने नळाला लावलेली मोटार बंद करण्यास सांगितले. त्यावरून चौघांनी महिलेला व तिच्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली. यात भांडणे सोडवणा-या महिलेचा हात फ्रॅक्चर झाला. ही घटना 1 मार्च रोजी पिंपरी येथील कैलास नगर येथे घडली असून याबाबत 10 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता गुरुचरणसिंग दरबार (वय 73) असे हात फ्रॅक्चर झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याबाबत परमजीतकौर निर्मलसिंग ब्लगन (वय 45, रा. कैलास नगर पाण्याच्या टाकीजवळ, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. 10) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिता रामनरेश चौहान (वय 37), काजल राम नरेश चौहान (वय 22), खुशी रामनरेश चौहान (वय 19), राम नरेश नेपालसिंग चौहान (वय 40, सर्व रा. कैलास नगर पाण्याची टाकी जवळ, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी त्यांच्या घराच्या नळाला मोटार लावल्याने फिर्यादी यांच्या घराच्या नळाला पाणी येणे बंद झाले. तुमच्या घराच्या नळाला लावलेली मोटर बंद करा, आमच्या घराच्या नळाला पाणी येत नाही, असे फिर्यादी या आरोपींना म्हणाल्या. ‘आम्ही मोटर बंद करणार नाही जा तुला काय करायचे ते कर’, असे आरोपी म्हणाले. त्यानंतर फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांची आई सविता दरबार या भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करीत होत्या. आरोपींनी सविता यांना ढकलून दिले. त्यात सविता यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.