Akurdi News : किरकोळ कारणावरून दोन गटात वाद

परस्पर विरोधात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन गटात मंगळवारी (दि. 23) रात्री वाद झाला. दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रोशन छबुराव काळे (वय 34, रा. प्राधिकरण, निगडी) यांच्या फिर्यादीनुसार, बालाजी सातपुते, योगेश मानकेरे, श्रेयस टाकळकर, रोहित ओवाळ, आदित्य यादव, शुभम दत्तात्रय जाधव आणि त्यांच्या दोन ते तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बालाजी आणि योगेश हे गंगाई उद्यानात मद्यपान करत असल्याने फिर्यादी यांनी त्यांना टोकले होते. तसेच 20 मार्च रोजी झालेल्या भांडणात फिर्यादी यांनी मध्यस्थी केली होती. या कारणावरून आरोपींनी कोयते व सिमेंटच्या ब्लॉकने मारून फिर्यादी यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.

याच्या परस्पर विरोधात शुभम दत्तात्रय जाधव (वय 21, रा. गंगानगर, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण काळे, रोशन काळे, साहिल काळे, सागर कान्हूरकर, राहुल कान्हूरकर, प्रदीप गुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव यांच्या फिर्यादीनुसार, जाधव मंगळवारी रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांचे मित्र त्यांच्यासोबत होते. काही वेळेपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी जाधव यांना शिवीगाळ करून सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. काठीने, पट्ट्याने मारून खुनी हल्ला केला असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.