Bhosari : भंडा-याची मुक्त उधळण करत ढोल-ताशांच्या साथीने रंगली विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे भोसरीत विसर्जन मिरवणूकीत चांगलीच रंगत आणली होती. ढोल-ताशांचा साथीने भोसरीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले. दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

रात्री नऊपर्यंत १५ सार्वजनिक मंडळांसह सुमारे ९०० घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. भोसरीतील सार्वजनिक गणेश मंडळांची अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत आज बुधवारी गणेशाचे विर्सजन करण्यात आले.

कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृहा शेजारील हौदात आणि विहिरीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. काही मंडळांनी मोशी येथे इंद्रायणी नदीत विसर्जन केले. महापालिकेच्या वतीने भोसरीतील विहीरीजवळ, तसेच मोशी येथे विसर्जन घाटावर अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच महापालिकेने भोसरीतील पीएमटी चौकात मिरवणूक काढलेल्या गणेश मंडळांच्या स्वागतासाठी कक्ष उभारला होता. महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या हस्ते सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.