Pimpri : गणेश मूर्तींचे हौदातच विसर्जन करावे – श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्व नागरिकांनी आपले सण, उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करावेत. मांगल्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव देखील पिंपरी – चिंचवड शहरात मोठ्या भक्ती भावाने, उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शहराच्या जीवनवाहिन्या असणा-या पवित्र इंद्रायणी आणि पवना नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्था, संघटना व उद्योजक पुढाकार घेऊन काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आसवाणी असोशिएटस्‌ आणि इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. याचा गणपती मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवाणी यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच खासगी जागेत गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. त्याचे उद्‌घाटन सोमवारी (दि. 17) आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आयुक्त हर्डीकर यांनी स्वहस्ते गणेश मूर्तींचे हौदात विसर्जन केले. माजी आमदार अण्णा बनसोडे, भाजपा शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, नगसेवक शीतल शिंदे, डब्बू आसवाणी, नगरसेविका सीमा सावळे, उद्योजक राजू आसवाणी, श्रीचंद आसवाणी, विजय आसवाणी, सुरेश जुम्माणी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका माधुरी मुलचंदाणी, सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकाणी, जयहिंद हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

विजय आसवाणी यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, वैभवनगर येथे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. यामध्ये आठ फुट, नऊ फुट, बारा फुट आणि सोळा फुट खोलीचे हौद आहेत. याठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे यासाठी जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे घरोघरी जाऊन, सोसायट्यांमधील मंडळांच्या पदाधिका-यांना भेटून आवाहन व प्रबोधन केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी पिंपरीगाव, काळेवाडी, तापकीरनगर भागातील छोट्या मोठ्या मंडळांनी, सोसायटीतील मंडळांनी आणि घरगुती एकूण 265 गणेश मृर्तिंचे विसर्जन करण्यात आले. रविवारी दि. 23 सप्टेंबरपर्यत याठिकाणी हि सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड दिले आहे. संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. जीवरक्षक विधीवत पध्दतीने या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन करतील. या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.